'त्या’ १४ वर्षीय मुलाचा भुलीच्या औषधाची रिॲक्शन आल्याने मृत्यू; पूना हाॅस्पिटलचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:20 AM2024-06-27T10:20:59+5:302024-06-27T10:21:21+5:30
पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पूना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता
पुणे : शस्त्रक्रिया करताना ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याला भुलीच्या औषधांमुळे ‘मॅलिग्नंट हायपरथर्मिया’ ही दुर्मीळ रिॲक्शन आली हाेती. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात शिफ्ट करून उपचारही करण्यात आले. परंतु, रिॲक्शन तीव्र असल्याने त्याचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण पूना हाॅस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. जे. रवींद्रनाथ यांनी दिली.
पूना हाॅस्पिटलमध्ये पायाची शस्त्रक्रिया करताना डाेणजे येथील एका १४ वर्षीय मुलाचा १४ जून राेजी मृत्यू झाला हाेता. त्याबाबत हाॅस्पिटलने स्पष्टीकरण दिले. डाॅ. रवींद्रनाथ म्हणाल्या की, ‘ही रिॲक्शन फार दुर्मीळ असून, त्यामुळे रुग्णाच्या हृदयाचे ठाेके वाढतात आणि शरीराचे तापमान जे ९८ फॅरेनाइट असते ते जवळपास ११३ पर्यंत गेले हाेते; तसेच स्नायू आकुंचन पावतात. वर उतारा म्हणून जे डँट्रियम नावाचे इंजेक्शन असते ते आमच्याकडे तसेच पुण्यातील हाॅस्पिटलमध्ये काेणाकडेही नव्हते. मुंबईतून ते एका हाॅस्पिटलकडे हाेते; परंतु ते घेऊन येईपर्यंत रुग्ण दगावला. तसेच एका चाचणीद्वारे ही रिॲक्शन आल्याचेही सिद्ध झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
नेमकं पार्कर्ण काय?
पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पूना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा शस्त्रक्रिया करताना १४ जून राेजी मृत्यू झाला. हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांनी उपचारांत हलगर्जीपणा केल्याचा आराेप करत त्याप्रकरणी कुटुंबीयांनी विश्रामबाग पाेलिस ठाण्यात हाॅस्पिटलविरुद्ध लेखी तक्रार दिली होती. याप्रकरणी मुलाचे वडील सुबाेध मुरलीधर पारगे (वय ४६, रा. डाेणजे, ता. हवेली) यांनी पूना हाॅस्पिटलविरुद्ध पाेलिसांकडे तक्रार दिली होती. पारगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा स्वराज हा ११ जून राेजी क्लासवरून रिक्षाने येत हाेता. खडकवासला चाैपाटी येथे रिक्षाला दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली हाेती. त्यानंतर त्याला पूना हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याचा एक्सरे काढल्यावर त्याची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डाॅक्टरांनी त्यांना सांगितले. त्यासाठी ९० हजार रुपयांचा खर्चही सांगितला होता.
दरम्यान, पारगे यांनी ३० हजार रुपये भरले आणि उर्वरित शस्त्रक्रिया झाल्यावर भरण्याची विनंती केली होती. डाॅक्टरांनी स्वराजला १४ जूनला शस्त्रक्रिया करण्यासाठी सकाळी ७ वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. अकरा वाजता डाॅक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले की, ‘‘स्वराजला भुलीच्या इंजेक्शनची रिॲक्शन आली असून त्याच्या हृदयाचे ठाेके वाढले आहेत. असे अडीच लाखपैकी एका पेशंटला हाेऊ शकते आणि त्यासाठी आम्ही औषधे लिहून देताे. ती औषधे मुंबई किंवा दिल्ली येथे मिळतात. कमीत कमी दहा ॲम्प्यूल घेऊन या.’’ नातेवाईक ती औषधांची चिठ्ठी घेऊन मुंबईकडे रवाना झाले असता दुपारी चार वाजता स्वराजचे डायलिसिस करावे लागेल, असे सांगत ८० हजार भरा, अन्यथा डायलिसिस करणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर नातेवाइकांनी पैशांची जुळवाजुळव करत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हाॅस्पिटलचे डाॅ. पत्की यांनी स्वराजची आई शीतल यांना औषधे आणू नका कारण स्वराजचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी हाॅस्पिटलमधील डाॅक्टर आणि हाॅस्पिटल प्रशासनावर कारवाई करावी, असे स्वराजचे वडील सुबाेध पारगे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले होते. दरम्यान, याबाबत पूना हाॅस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. आता मात्र हॉस्पिटलकडून खुलासा करण्यात आलाय.