‘त्या’ डाॅक्टरच्या मेहुण्याला ‘एटीएस’कडून अटक; दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय
By विवेक भुसे | Published: August 2, 2023 09:32 AM2023-08-02T09:32:24+5:302023-08-02T09:32:48+5:30
मुंबई कारागृहातून घेतले ताब्यात...
पुणे : जयपूर बॉम्बस्फोटाशी संबंधित दोन दहशतवाद्यांना पकडल्याच्या प्रकरणात आता इसिसशी संबंध जोडला गेला असून, एनआयएने यापूर्वी अटक केलेल्या एकाला दहशतवादविरोधी पथकाने आपल्या ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत पाचजणांना अटक झाली आहे. झुल्फिकार अली बडोदावाला (रा. ठाणे) असे त्याचे नाव आहे.
एनआयएने ३ जुलै २०२३ रोजी मुंबईतून चारजणांना अटक केली होती. तबिश नासेर सिद्दिकी, अबू नुसैबा, शरजील शेख, झुल्फिकार अली बडोदावाला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चौघाजणांनी दिलेल्या माहितीआधारे पुण्यात एनआयएने कोंढव्यातून डॉ. अदनान अली सरकार या डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. सरकारकडून काही गॅझेट आणि आयसिसशी संबंधित असलेली कागदपत्रे जप्त केली आहेत. झुल्फिकार बडोदावाला हा सरकार याचा मेव्हणा आहे. दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय एटीएसला आहे. त्यातून एटीएसने सोमवारी मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात अर्ज करून या प्रकरणात बडोदावाला याचा संबंध असल्याचा संशय असून, त्याच्याकडे चौकशी करण्यासाठी ताब्यात मिळावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी मुंबई कारागृहातून बडोदावाला याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
या दहशतवाद्यांचा फरार झालेला साथीदार शहानवाज आलम तसेच या दोन दहशतवादांना ते फरार असलेल्या काळात मदत करणाऱ्यांचा तपास दहशतवादविरोधी पथक करीत आहेत.