...म्हणूनच अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला; शरद पवारांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 06:03 PM2023-05-06T18:03:35+5:302023-05-06T18:03:49+5:30
नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे व त्यांनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मला वाटत होते
बारामती: भाजपला पर्याय देण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात आपला सहभाग असेल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पातळीवर विरोधकांची एकजूट होण्याची प्रक्रीया सुरु झालेली आहे. त्यातच मी बाजूला होणे योग्य नसल्याचे अनेक मान्यवरांनी मत व्यक्त केले. तसेच कार्यकर्त्यांनी देखील तीव्र भावना व्यक्त केल्या. त्या सर्व विचारात घेता मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय मागे घेतल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांचे शनिवारी बारामतीकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, बारामतीसह राज्य व देशातील लोकांच्या आशिर्वादाने मी ५६ वर्ष सक्रीय राजकारण करू शकलो. राज्यसभेची अजून तीन वर्षे शिल्लक आहेत. काही दिवसांपासून असे वाटत होते की आपण पर्याय तयार करणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून अध्यक्षपदाची मीच जबाबदारी घेतो आहे, पण नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे व त्यांनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मला वाटत होते. मी बाजूला होणे, याचा अर्थ घरीबसणे असा नाही, लोकांत, कार्यकर्त्यात राहणे, त्यांचे प्रश्न सोडवण, हा मनाशी निश्चय करुन मी अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय घेतला होता.
बारसू प्रकरणात शासनाच्या उद्योगमंत्री व प्रशासनासोबत माझ्याही दोन बैठका झाल्या आहेत, शेतकऱ्यांच्या हिताची जपणूकही होईल आणि राज्याच्या विकासालाही चालना मिळेल असा मार्ग कसा काढता येईल, असा प्रयत्न होता, पर्यावरण व शेतीचे नुकसान न करता काय मार्ग काढता येईल, या साठी पूर्ण तयारी करुन स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. पोलिस बळ वापरुन प्रकल्प यशस्वी होणार नसल्याचे पवार म्हणाले.