PMP ड्रायव्हरला मारहाण करणारा पुण्यातील तो पोलीस अखेर निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 03:16 PM2024-07-24T15:16:15+5:302024-07-24T15:17:14+5:30
किरकोळ कारणावरून कायदा हातात घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे मागणी केली जात होती
किरण शिंदे
पुणे : सकाळचे नऊ वाजून 40 मिनिट झाले होते. पुण्यातील बंडगार्डन रस्त्यावरून पीएमपीची बस निघाली होती. तर त्याच रस्त्यावरून दुचाकीस्वार पोलीसही निघाला होता. बस वाडिया कॉलेज जवळ आली अन् दुचाकीस्वार पोलीस कर्मचारीही. बसच्या पाठीमागून येणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांना डावीकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच परिसरात रस्त्याचं काम सुरू असल्याने त्यांचा हा प्रयत्न असफल ठरला. यावेळी अपघात होता होता राहिला. त्यानंतर चिडलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांना दुचाकी बस समोर आडवी लावली आणि पीएमपी चालकाला बुकलून काढलं. अंगावर वर्दी असतानाही या पोलीस कर्मचाऱ्यान पीएमपी चालकाची यथेच्छ धुलाई केली.
या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मारहाण करणारा पोलीस कर्मचारी टीकेचा धनी ठरला होता. त्याच्या या वर्तवणुकीवरून संपूर्ण पोलीस दलावरच टीका केली जात होती. अखेर या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी यासंदर्भातले आदेश काढले आहेत.
राहुल अशोक वाघमारे असं मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाचं नाव आहे. तो मोटर परिवहन विभागात नेमणुकीस आहे. भागवत बापूराव तोरणे या पीएमपी ड्रायव्हरला त्याने मारहाण केली होती. त्यादिवशी राहुल वाघमारे रात्रपाळी संपवून दुचाकीने घरी निघाले होते. वाडिया कॉलेज जवळ पीएमपी चालक भागवत तोरणे यांनी कट मारल्याचा राग मनात धरून त्यांनी पीएमपीला दुचाकी आडवी लावली.. आणि त्यानंतर बस मध्ये चढून वाघमारे यांनी ड्रायव्हर तोरणे यांना हाताने मारहाण केली. याच मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.. आणि यानंतर आता राहुल वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कायद्याचे ज्ञान असतानाही संबंधित बस चालकाविरोधात रीतसर कायदेशीर कारवाई न करता मारहाण केली. पोलीस शिपाई पदाचा दुरुपयोग केला.. बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका राहुल वाघमारे यांच्यावर ठेवण्यात आला. आणि याच कारणावरून २१ जुलै पासून त्यांचं निलंबन करण्यात आलंय.
खरंतर या घटनेनंतर पोलीस शिपाई राहुल वाघमारे आणि पीएमपी ड्रायव्हर बापूराव तोरणे यांच्यात समझोता झाला होता. वाघमारे यांनी संबंधित ड्रायव्हरची माफी मागितली होती. इतकच नाही तर या घटनेमुळे नुकसान भरपाई पोटी ड्रायव्हर तोरणे यांना तीन हजार रुपये देखील दिले होते. त्यामुळे याप्रकरणी ड्रायव्हरने तक्रारही दिली नव्हती. मात्र किरकोळ कारणावरून कायदा हातात घेणाऱ्याला काय म्हणावं असा प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे मागणी केली जात होती. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मारहाण करणाऱ्या राहुल वाघमारे या पोलीस शिपायाला निलंबित केले.