'त्या' रेड सिग्नलने घेतला त्याचा जीव, नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 11:56 AM2023-10-25T11:56:26+5:302023-10-25T11:58:49+5:30

ही घटना बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली...

'That' red signal cost him his life, another fatal accident near Navale Bridge; Death of a biker | 'त्या' रेड सिग्नलने घेतला त्याचा जीव, नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

'त्या' रेड सिग्नलने घेतला त्याचा जीव, नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

धायरी (पुणे) : कात्रज चौकाकडून येणाऱ्या ट्रकने नवले पुलाजवळ सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली. त्यामुळे समोर असणाऱ्या इतर पाच वाहनांनाही जोराची धडक बसून विचित्र अपघात झाला यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून संदेश बानदा खेडेकर (वय: ३४ वर्षे, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कात्रज - कोंढवा रस्ता, पुणे) असे त्या तरुणाचे नाव आहे.

ही घटना बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रकचालक पंकज राजाराम नटकरे ( वय: २१ वर्षे, रा. बसवकल्याण, बिदर,कर्नाटक) यास सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. नवले पुल परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने प्रशासनाच्या विरोधात यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला.

मिळालेली माहिती अशी की, कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेला ट्रक क्रमांक (KA 56- 3165) यावरील चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. यात चार चारचाकी वाहने व एका दुचाकीचा विचित्र अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारानी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने थोड्या वेळाकरिता वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तत्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. 

वाहतूक विभागाने केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष...

नवले पुल चौकातून राष्ट्रीय महामार्ग ६५ व ४८ वरील सर्व्हिस रस्ते जोडले जातात. कात्रज चौक ते नवले पुल हा रस्ता सहा पदरी असून तीव्र उताराचा आहे. नवले चौकात येणारी वाहने वेगात येतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस सिग्नलला उभे असलेल्या वाहनावर वेग नियंत्रित न झाल्यामुळे ब्रेक न लागल्याने जड वाहनांकडुन सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देऊन गंभीर अपघाताचे प्रकार याआधी घडलेले आहेत. नवले पुलास प्राप्त झालेल्या भौगोलिक उतारामुळे व घडलेल्या अपघातांच्या उपाय योजनेच्या दृष्टीकोनातून खालील उपाय करणे गरजेचे असल्याचे पत्र वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी दोन महिन्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे देऊनही अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. 

उपाययोजना करणे आवश्यक... 

 १. नवले पुल चौकात आयआरसी नॉर्मप्रमाणे गतिरोधक बसविण्यात यावा, त्यामुळे वाहनाचा वेग कमी होईल.

२. कात्रज चौक ते नवले पुल रस्त्यावर नवले पुल चौकापासून २०० मीटर अलीकडे बाबजी पेट्रोल पंपासमोर व १०० मीटर अलीकडे रम्बलर्स स्ट्रीप्स आखण्यात यावेत. तसेच याठिकाणी सोलार रेड ब्लीकर्स बसविण्यात यावेत.

Web Title: 'That' red signal cost him his life, another fatal accident near Navale Bridge; Death of a biker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.