संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:31 PM2024-07-03T18:31:04+5:302024-07-03T18:31:35+5:30
हिरवाई गार्डनकडे पुणेरी पाटी प्रमाणे अजबच बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरद्वारे महिलांना कपड्यांबाबत सल्ला देण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी पुण्यात येत असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी महिलांच्या पेहरावावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावे, असे ते म्हणाले होते. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. आता त्यावरून पुण्यातील हिरवाई उद्यानाच्या गेटवर बॅनरबाजी पहायला मिळाली आहे.
हिरवाई गार्डनकडे पुणेरी पाटी प्रमाणे अजबच बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरद्वारे महिलांना कपड्यांबाबत सल्ला देण्यात आला आहे. “महिलांनो असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेनं तुमच्याकडे बघता कामा नये” असा मजकूर लिहिलेला आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर असणाऱ्या हिरवाई उद्यान येथे हे बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर मस्त ग्रुपने लावला आहे. शिवाय त्यावर सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा फोटो देखील लावण्यात आला आहे.
या बॅनरला प्रत्यूत्तर म्हणून त्याच शैलीत त्रस्त ग्रुपनेही दुसरे बॅनर लावले आहे. पुरुषांनो मन इतके निखळ ठेवा की कुणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये - त्रस्त ग्रुप असा मजकूर या दुसऱ्या बॅनरवर आहे. सध्या याच बॅनरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
भिडे यांना पोलिसांची नोटीस
पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली होती. पालखीला मानवंदना करताना कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्या. तेढ निर्माण करणारी भाषणे आज करू नका, अशा सूचना पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना दिल्या होत्या. यंदा पोलिसांनी आधीच त्यांना नोटीस पाठवली होती. तरीही भिडे यांनी एम रोडवरील जंगली महाराज मंदिराडजवळ धारकऱ्यांना संबोधित करताना हे वक्तव्य केले होते. यावरून विरोधकांनी, महिला संघटनांनी त्यांचा निषेधही केला होता.