'माझ्या आयुष्यातील ती सर्वात मोठी चूक'; अशोक सराफ यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 07:51 AM2023-01-09T07:51:56+5:302023-01-09T07:52:05+5:30
अभिव्यक्ती व रावेतकर यांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त तीनदिवसीय ‘अशोक पर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे : पूर्वी माझे ‘डार्लिंग डार्लिंग’ हे नाटक बालगंधर्व रंगमंदिरात तब्बल दीड महिना हाउसफुल चालले होते. तेव्हा मी तिथेच मुक्काम ठोकून होतो; पण, आता बालगंधर्वमध्ये राहण्याची तशी सोय आहे; पण तिथे राहावे तशी सोय राहिलेली नाही, असा टोला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी बालगंधर्व रंगमंदिरातील सोयींवर मारला.
अभिव्यक्ती व रावेतकर यांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त तीनदिवसीय ‘अशोक पर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रविवारी अभिनेते प्रशांत दामले यांनी अशोक सराफ यांची मुलाखत घेतली. दामले म्हणाले, ‘अशोक सराफ यांना बोलतं करणं अत्यंत अवघड आहे. त्यापेक्षा मी दोन प्रयोग अधिक करीन,’ यावर उपस्थित रसिकांनी मनमुराद दाद दिली. पूर्वी आणि आताच्या चित्रपट निर्मितीमध्ये बदल काय झाले? यावर सराफ म्हणाले, आता फक्त तांत्रिक बाबींवर खूप लक्ष दिले जाते.
एक चूक
सराफ म्हणाले, ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक स्वीकारले नाही, ही माझ्या आयुष्यातील खूप मोठी चूक होती. कारण त्यानंतर ते नाटक खूप गाजले. परंतु, दुसरीकडे, माझ्या या चुकीमुळे मराठी लोकांना एक चांगला नटदेखील मिळाला आहे.’
बायकोमुळे शिस्त
निवेदिता सराफ आयुष्यात आल्यामुळे एक शिस्त लागली. ती आहे म्हणून मी शिस्तबद्ध असतो. लग्नाअगोदरही शिस्त पाळायचो. परंतु, निवेदिता घरात आल्यानंतर मला स्थैर्य मिळाले, असे कौतुक अशोक सराफ यांनी आपल्या पत्नीचे केले.