हेच ते दाभोलकर...! दोघांनी इशारा करताच कळसकर, अंदुरेने झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 01:40 AM2018-09-16T01:40:15+5:302018-09-16T06:26:54+5:30

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रसंगी घटनास्थळी चौघेजण हजर होते, असे स्पष्ट झाले आहे.

That's it, Dabholkar ...! Both of them made an announcement, | हेच ते दाभोलकर...! दोघांनी इशारा करताच कळसकर, अंदुरेने झाडल्या गोळ्या

हेच ते दाभोलकर...! दोघांनी इशारा करताच कळसकर, अंदुरेने झाडल्या गोळ्या

googlenewsNext

पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरून आलेल्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी हत्या केली. त्यांना मदत करण्यासाठी घटनास्थळी दोघेजण आधीच घटनास्थळी महर्षी शिंदे पुलावर येऊन थांबले होते, असा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी न्यायालयात केला. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रसंगी घटनास्थळी चौघेजण हजर होते, असे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकर याला कोठडीची मूदत संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी दिले. आतापर्यंत दोनच हल्लेखोर असल्याचे तपासात पुढे आले होते. मात्र, सीबीआयने न्यायालयात दावा केला की, हल्लेखोर शरद कळसकर याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनाही डॉ. दाभोलकर कोण आहेत हे माहिती नव्हते, त्यामुळे त्यांची ओळख पटवून देण्यासाठी २० आॅगस्ट २०१३ रोजी महर्षी शिंदे पुलावर सकाळी सव्वासात वाजण्याच्या आधीच दोनजण उपस्थित होते. कळसकर आणि अंदुरे दुचाकीवरून पुलावर पोहचल्यानंतर त्यांनी पुलावर असलेल्या व्यक्तींपैकी डॉ. दाभोलकर कोण आहेत हे त्यांना सांगितले.

दोघांकडून डॉ. दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर कळसकर आणि अंदुरे यांनी गोळ्या झाडल्या आहेत. कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोन जण खुनाच्या कटात सहभागी होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या दोघांचा सीबीआयने तपास सुरू केला असून त्याकरिता कळसकर यांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी केली. सीबीआयच्या तपासात प्रगती असल्याचे न्यायालयाच्या निर्देशनास आल्याने, न्यायालयाने कळसकर याच्या पोलीस कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान कळसकर याला एटीएसने अटक केली तेव्हा त्याच्याकडून बंदूक आणि दुचाकी जप्त करण्यात आहे. त्यामुळे त्याच्याकडून हस्तगत करण्यासारखी कोणतीही वस्तू राहिलेली नाही. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी, अशी मागणी त्याचे वकील धर्मराज चंडेल यांनी केली.

राऊत, कळसकरकडून चार पिस्टलची विल्हेवाट
वैभव राऊत आणि शरद कळसकर यांच्याकडे चार पिस्तूल होते. त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ते २३ जुलै २०१८ रोजी राऊत याच्या नालासोपारा येथील घरातून दुचाकीवर निघाले. त्यानंतर पिस्तुल तोडून त्याचे तुकडे मुंबईतील एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात टाकून दिले. हे तुकडे ज्याठिकाणी फेकण्यात आले, ती जागा ठाणे येथील कळवा पूल, वसईतील भार्इंदर पूल किंवा कल्याण खाडी पूल यापैकी एक जागा आहे. मात्र, नेमकी जागा कळसकर याला आठवत नाही. त्याबाबत प्रत्यक्ष जागेवर पुन्हा नेऊन चौकशी करायची असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले. फेकून दिलेल्यापैकी एक पिस्तूल दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरल्याचा संशय आहे.

कळसकरसोबत राहण्याची परवानगी द्या
अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्याकडे सीबीआय कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीकडून कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येबाबत तपास करण्यात आलेला आहे, तर दिगवेकर याला मारहाण झाली आहे. त्यामुळे कळसकर याच्या कोठडीचादेखील गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे कळसकर याला पोलीस कोणत्या प्रकारे त्रास देत नाही ना अथवा त्याचेकडे दुसऱ्या तपास यंत्रणा तपास करताय का, यावर लक्ष ठेवण्याकरिता कळसकरचे वकील धर्मराज चंडेल यांनी न्यायालयात अर्ज करून आरोपीसोबत राहण्याची परवानगी मागितली आहे. तसेच, पोलिसांनी आरोपीकडे चौकशी करताना त्याच्यांमधील संभाषण ऐकू येणार नाही इतके अंतर ठेवण्यात येईल, असे सांगितले असून त्याकरिता सर्वाेच्च न्यायालयाचे एका केसचा दाखला त्यांनी सादर केला. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

Web Title: That's it, Dabholkar ...! Both of them made an announcement,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.