लोकमत रिपोर्ताज | ...म्हणूनच नारायणगाव झाली तमाशाची पंढरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:01 AM2023-03-28T10:01:04+5:302023-03-28T10:05:20+5:30

ढोलकीचा नाद ऐकताक्षणीच एकतर टाळी वाजते, नाहीतर मग शिट्टी ! ज्या तमाशात ही ढोलकी वाजते, नृत्यबिजली कडाडते तो तमाशा. नक्की ठरतो तरी कुठे, काय आहे त्याच्या मागचे इंगित ! तमाशाचे गाव नारायणगावचा हा खास ‘लोकमत रिपोर्ताज !’

That's why Narayangaon became the center of the tamasha in maharashtra lokmat reportaj | लोकमत रिपोर्ताज | ...म्हणूनच नारायणगाव झाली तमाशाची पंढरी

लोकमत रिपोर्ताज | ...म्हणूनच नारायणगाव झाली तमाशाची पंढरी

googlenewsNext

- दुर्गेश मोरे

पुणे :नारायणगाव! गावाचं नाव देवाचं आहे; पण ही आहे तमाशा पंढरी. कारण इथं राज्यातल्या जत्रायात्रांमधील तमाशाच्या सुपाऱ्या फुटतात. कोट्यवधी रुपयांचे सौदे होतात. गावांमध्ये ढोलकीचा नाद घुमतो, त्याच्या नादावर घुंगरू छणछण करतात, ते सगळं आधी इथं या नारायणगावात ठरतं. आहे तरी कसं हे नारायणगाव? कोण करतं हे सौदे? सुपाऱ्या देतात, घेतात ते लोक असतात तरी कोण ? अन् इथेच का देतात?

तमाशाची पंढरी नारायणगाव

नारायणगाव दिसायला इतर गावासारखंच एक गाव आहे; पण गुढी पाडव्याला आणि त्याच्या काही दिवस आधी गावात गर्दी होते. बाहेरगावची लोक येतात. राहुट्या टाकतात, मुक्काम करतात आणि मग गावाची हवा बदलायला सुरुवात होते. या राहुट्यात होतात तमाशाचे सौदे. पूर्वी हजारात व्हायचे, त्याचे काही लाख व्हायचे. आता सुपाऱ्याच लाखालाखाच्या फुटतात, त्याचे कोट्यवधी होतात. जग बदललं, देश बदलला, कोटीची भाषा होऊ लागली, मग तमाशानेच काय घोडं मारलं. लाखाची सुपारी अगदी सहज फुटते.

तमाशा स्वतंत्र अशी एक कला नाही. मुस्लिम राजवटीच्या आधीपासूनच तिचे महाराष्ट्रात अस्तित्व होते. जागरण, गोंधळ, भारुड, लळिते आणि दशावतार यांसारख्या विविधनाट्य संस्कारातून तमाशाने आकार घेतला असल्याचे काही संशोधक व जाणकार सांगतात. तमाशातील सर्व कलाकार हे अठरा पगड जातीतले आणि बहुतांश हे कलावंत जुन्नर तालुक्यातीलच. त्यापैकीच एक भाऊ मांग नारायणगावकर. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुतण्याच्या साह्याने भाऊ-बापू यांनी पहिला तमाशा सुुरू केला. त्यांच्या तमाशाचे खास वैशिष्ट्य म्हणजे वग सादर करण्याची शैली. भाऊंच्या या शैलीमुळे त्यांच्या तमाशाला खूप प्रसिद्ध मिळवून दिली. संत गोरा कुंभार, राणीनं डाव जिंकला, मेवाडचा कोळी आणि गड आला पण सिंह गेला असे अनेक भाऊंचे वग आहेत. तमाशातील योगदानाबद्दल पहिल्यांदाच राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेला कलावंत म्हणून भाऊ मांग नारायणगावकर यांचा नेहमीच उल्लेख केला जातो. पूर्वी एका मोठ्या तमासगिराच्या गावात जाऊन तमाशा व्यवसाय करायचा, अशी प्रथा होती. पठ्ठे बापूरावांच्या काळानंतर तमाशा क्षेत्रात भाऊंचेच नाव प्रसिद्ध होते. त्यामुळे सर्वजण इथेच नारायणगावला येऊन राहुट्या थाटू लागले अन् सुपाऱ्या फुटू लागल्या. भाऊंच्या नावामुळेच नारायणगावला तमाशा पंढरी आजही म्हटले जाते, असे जुन्या तमाशांचे फडमालक आणि जाणकार सांगतात.

अशी फुटते सुपारी

सुपारी म्हणजे काय ते सांगायला हवं. सुपारी म्हणजे करार. गावागावांमधील उत्सवाचे प्रमुख येतात. फडाच्या मालकाला किंवा त्याने मॅनेजर ठेवला असेल तर त्याला भेटतात. कोणाचा फड, कोण नाचणार, कितीजणी नाचणार, वग कोणता यावर पैसे किती द्यायचे ते ठरतं. तारीख, वार, वेळ, ठिकाण, ठरलं की मग इसार म्हणजे ॲडव्हान्स द्यायला लागतो. तो दिला की मग फुटली सुपारी म्हणायचं. गावात जाहिरात करायला पुढारी रिकामे आणि तयारी करायला तमासगीर मोकळे.

राहुटी म्हणजे काय ?

गावातल्या मोकळ्या पटांगणात एका शेजारी एक अशा राहुट्या पडतात. मधली मोकळी जागा वाहने उभी करण्यासाठी. राहुट्यांच्या दर्शनी भागात तमाशाची जाहिरात. म्हणजे पोस्टर. त्यावरची नृत्यांगणा मोठी. बाकी तमाशाची माहिती. काही राहुट्यांच्या बाहेरच वगांची मोठी जाहिरात सुरू असते. म्हणजे कर्ण्यावर कोणी ओरडून सांगत असतो तर कुठे वगातील एक-दोन प्रसंगाच्या टेपाही लावतात.

अशी होते व्यवहाराची बैठक !

राहुट्याचे दोन भाग. दर्शनी भागात दोन खाटा किंवा खालीच बैठक व्यवस्था. ही तमाशा ठरवण्याच्या बैठकीची जागा. तेथेच जवळ एक पेटीदेखील असते. त्यात फडासंदर्भातील माहिती तसेच कागदपत्रे असतात.

दुसऱ्या भागात कलावंतांसाठी किंवा राहुट्यामध्ये मालक, व्यवस्थापकाला राहण्याची, जेवणाची व्यवस्था. १० ते १२ लोक या राहुट्यांमध्ये वास्तव्य करत असतात. मालक किंवा व्यवस्थापकांशी बोलून तमाशा ठरवावा लागतो.

यंदा झाले असे !

यंदा ७० हजारांपासून ते ३ लाखांपर्यंत बोली लागल्याचे समजले. फार घासाघीस करतात असे फडमालकांचे म्हणणे तर काहीच्याबाही सांगतात हो अशी गावातून तमाशा ठरवण्यासाठी आलेल्यांची तक्रार होत असल्याचे काही फड मालकांनी सांगितले.

हजेरी म्हणजे....!

तमाशा रात्रीचाच करायचा की दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरीही लावायची हा एक मोठाच भाग. ही हजेरी म्हणजे, तमाशा रात्री १२ वाजेपर्यंत सादर होतो, दुसऱ्या दिवशी त्यातल्या नृत्यांगणांनी गाणी आणि नृत्यही सादर करायचे. बहुतांश ठिकाणी दुसऱ्या दिवशी हजेरीची प्रथा आहेच. त्याने गावातील सगळ्यांचीच हौस भागते. गण, गौळण व लावण्यांवर ही हजेरी होते. अशा तमाशाची रक्कम अर्थातच दुप्पट होते. त्यामुळे कलावंताची इच्छा असो, नसो, फडमालकही दुसऱ्या दिवशीच्या हजेरीसाठी आग्रही असतो. खरी घासाघीस यावरूनच होते.

फडाचे अर्थकारण !

एका फडाचा दिवसाला १ लाख खर्च

तमाशा क्षेत्रामध्ये साधारण १५ ते २० मोठे फड आहेत तर हंगामी फडांची संख्या २०० ते ३०० आहे. एका फडात १५ ते २० कलाकार, मजूर, चालक, आचारी असे एकूण साधारण १०० कर्मचारी असतात. वाहतूक तसेच अन्य खर्च धरला तर एका फडाला दिवसाला १ लाखाच्या आसपास खर्च येतो. पूर्वी तमाशा बैलगाडीतून जात होता. आता मात्र त्यात बदल झाला आहे. अलीकडे तमाशा अधिकाधिक व्यावसायिक झाला आहे. वाहने, स्टेज, लाईट, जाहिरात तसेच आधुनिक वाद्ये या सर्वांच्या सादरीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या मजुरांची व इतर माणसांची तमाशात संख्या वाढली. कलावंतांना दिवसा हजार ते दीड हजार रूपये मानधन दिले जाते. पूर्वी हे मानधन ४०० ते ५०० रूपये होते. महागाईच्या भस्मासुराने तमाशालाही ग्रासले आहे.

तमाशा कलावंतांची जिनगाणी तमाशातील बहुतेक कलावंतांना घर सोडून वर्षानुवर्षे फडाबरोबर भटकावंच लागत. कारण एकट्या त्याचेच नाही तर अनेकांची रोजीरोटी त्यावरच अवलंबून असते. महत्त्वाचा कलावंत नसेल तर तमाशा ढासळतो. म्हणजे तो गाजत नाही. प्रेक्षकांची पसंती मिळत नाही. असं सारखं होत गेलं की, मग बदनामी सुरू होते. त्यांच्यात काही दम नाही, अशी पब्लिसिटी होते. त्यामुळे फारच महत्त्वाचं काही असलं तरच फडमालक कलावंतांना घरी जाण्याची सवलत देतो. तेही बदली कलाकार असला तरच. नाहीतर मग 'शो मस्ट गो ऑन' हे इथेही आहेच.

मुदतीचे फड!

काही मोठे फड ७ महिन्यांचे असतात. अशा फडाचं सगळं काही तमाशाचे जास्तीत जास्त प्रयोग होण्यावर अवलंबून असतं. हंगामी म्हणजे हौशी कलावंतांना बरोबर घेत एखाद्या जाणत्याने सुरू केलेले फड ४ महिन्यांचे असतात. कलावंत फडाच्या मालकाशी वर्षाचा करार करतो. करार झाला की, फड मालक एक ठोस रक्कम त्या कलावंताला देतो. ती रक्कम दरमहा त्याच्या वेतनातून कपात केली जाते. त्यामुळे कलावंताचे संपूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यातच जाते म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याची अखेर फडमालकाच्या दारातच होते.

कलावंतांचा करार!

एखाद्या कलावंताला दुसऱ्या फडात जायचे असेल तर आधीच्या फडातून जी उचल घेतली ती रक्कम आधीच्या फडमालकाला द्यावीच लागते. कराराची मुदत संपली की, शिवाय करार संपला तरच अन्य ठिकाणी जाता येते. सहसा असे कधी होत नाही. मोठ्या फडांमध्ये तर अपवाद वगळता होतच नाही.

असा दिवस अशी रात्र!

ज्या गावात कार्यक्रम करायचा आहे तेथे सायंकाळी ही मंडळी पोहचतात. रात्री १२ पर्यंत तमाशा होतो. त्यानंतर सकाळी हजेरी असेल तर ती उरकून पुढच्या गावाला जायचे. मग वाटेत कुठे नदी, ओढा असेल तर त्या ठिकाणी विसावा घ्यायचा अन् सायंकाळपर्यंत पुढच्या गावी पोहोचायचे. फड जितके दिवस सुरू तितके दिवस हेच सर्वांचे आयुष्य. तमाशा सुरू असताना वाहवा करणारे गावातील लोक दुसऱ्या दिवशी याच कलावंतांना, विशेषतः पुरूष कलावंतांना हिंग लावूनही विचारत नाहीत. खायला घालण्याची गोष्ट दूरच! अनेक गावांमध्ये तर त्यांना देवळात किंवा उघड्यावर रात्र काढावी लागते.

तमाशा संपल्यावर परवडच!

तमाशाची ४ किंवा ७ महिन्यांची मुदत संपली की, उरलेल्या महिन्यांमध्ये मिळेल ते काम या कलावंतांना करावे लागते. कोणी हातगाडीवर चहा विकतं, तर कोणी कुठं मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतं. रात्री वगात राजाचे काम करून वाहवा मिळवणारा कलावंत त्यामुळेच दुसऱ्या दिवशी मोलमजुरी करताना दिसतो. उत्कृष्ट ढोलकी वाजवणारा कलावंत मजुरीच्या शोधात दिवसभर वणवण करताना दिसतो, तर आदल्या दिवशीची राणी दुसऱ्या दिवशी शेतात राबताना समोर येते. वरच्या वर्गातून या क्षेत्रात येणारा एखादाच पठ्ठे बापूराव, बाकी बहुतेक कलावंत समाजाच्या उपेक्षित स्तरामधून आलेले. कलेच्या हौसेपायी आयुष्याची राखरांगोळी करून घेतलेले.

सराव ठेवावाच लागतो-

असे बरेच कलावंत नारायणगावात फडमालकाच्या गळी पडताना दिसतात. नव्या हंगामातील बोलणी करायचा त्यांचा प्रयत्न असतो. मोठ्या फडातील कलावंत उरलेल्या दिवसात मिळेल ते काम करण्याबरोबरच वग, गण, गौळण याचा सराव करतात. कारण तेच त्यांचं भांडवल असतं. त्यात कुशलता दिसली नाही, की तो कलावंत हळूहळू बाद होत जातो.

अखेरची शोकांतिकाच!

तमाशा कलावंत म्हणून त्यांना परिस्थिती जशी आहे त्याच्याशी जुळवून घ्यावेच लागते. या अनिश्चित आणि सततच्या कर्जाने, घराच्या चिंतेने मग त्यांच्यातील अनेकांना व्यसन लागते. कित्येकदा शारीरिक भूकही भागवली जाते. पण, त्यातून अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी ज्यावेळी घरी जातात, त्यावेळी घरचे लोक काही वेळा स्वीकारत नाहीत. त्यामुळे पुन्हा ज्या ठिकाणावरून आलो तेथेच जावे लागते. तमाशातील कलावंतांचे आयुष्य असे खडतर आहे.

 

काही जणांनी तमाशाचे रूप बदलले. तमाशामध्येही महिला आहेत. पण, असे अश्लील कृत्य कधीच कोणी पाहिले नाही. त्याचा फटका तमाशाला बसत आहे. पूर्वी काळूबाळूचा तमाशा नऊवारी साडीत केला होता. पण, आता ही परिस्थिती बदलली आहे. लोकांची मागणीदेखील बदलली आहे. सध्या रसिकांतून चित्रपटातील गाण्यांवर भर आहे. त्यामुळे तसा बदल केला आहे. पण, काही वेळा स्थानिकांकडूनही तमाशा सुरू असताना कलाकारांना त्रास दिला जातो. पैसे देऊन तमाशे पाहण्याचे बंदच झाले आहे. अनेक समस्या आहेत. आगामी पाच-सहा वर्षांत तमाशा बंद होईल की काय असे वाटते.

-आत्तारभाई शेख

पारंपरिक तमाशाला पूर्वी चांगले दिवस होते. समाजमाध्यमांमुळे तमाशाकडे रसिकांनी पाठ फिरवली आहे. काही वेळा असे वाटते की लोककला संपते की काय? खर्चही वाढला आहे. नवीन कोणी कलाकार येत नाही. जे आहेत त्यांची मागणी जास्त आहे. महागाई वाढल्याने खर्च वाढला असून, फडमालकाला नकोसे झाले आहे. आमच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. आता तरी डिस्कोला अन् अश्लील नृत्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे ही परंपरा पुढे जाणार की इथंच संपणार अशी भीतीही वाटते.

-अंजलीराजे जाधव नाशिककर

सध्या हंगामात मागणी वाढली आहे. तरुण मुलं कार्यक्रम व्यवस्थित करू देत नाही. तरुणांना डिस्को हंगाम हवा आहे. ही शोकांतिका आहे. तिकीट देऊन तंबूचे तमाशा होत नाही. ही कला धोक्यात आली आहे. रसिकांनी या कलेला आधार दिला पाहिजे. काहींनी डिस्कोच्या नावाखाली अश्लीलता यामध्ये आणली आहे. त्यालाचा दाद मिळते. तमाशात कधी असे घडले का याचाही विचार होणे गरजेचे आहे. तमाशातील गण, गौळण, विनोद ऐकायला पाहिजे. बदल नाही झाला तर येत्या दोन वर्षातच फड बंद होतील. कलावंतांचे आयुष्य खूप खडतर आहे. यावर सरकारने काही तरी केले पाहिजे.

- रघुवीर खेडकर

सध्याच्या काळात फड सांभाळणे कठीण झाले आहे. महागाईही वाढत आहे. त्यामानाने सुपारी मात्र कमी मिळते. खर्च भागवताना परवड होते. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर लोककला आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, एक खिडकी योजना अंतर्गत तमाशाला परवानगी मिळणे, राज्यातील तमाशा फडांना पोलिस बंदोबस्त मिळावा, नारायणगाव येथे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर स्मारकाची निर्मिती करणे तसेच राज्यातील तंबूच्या तमाशा फडांना प्रतिवर्षी अनुदान मिळावे, तमाशा फडांच्या गाड्यांना टोल माफी, महाराष्ट्रभर तमाशा महोत्सवाचे आयोजन करणे यांसारख्या उपाययोजना होणे गरजेचे आहे.

-मोहित नारायणगावकर

उमेदीच्या काळात तमाशातील कलावंतांना सुगीचे दिवस असतात. पण, त्यानंतर अत्यंत खडतर परिस्थितीत ना जीवन जगायला लागते. दोन अडीच हजार मानधन मिळते. त्यामध्ये औषधे होतात. मग पुढे काय करायचे. त्यासाठी मानधनामध्ये वाढ होणे गरजेचे आहे. सध्या गावातली पोर नाचले की तमाशा चांगला झाला, असे म्हणतात. सिनेमातील गाणी हवी असतात. त्यामुळे लोककला संपण्याच्या मार्गावर आहे. रसिकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकगीते, वग नाट्य, थोडासा फार्स बघितला पाहिजे, गण गाैळण पाहिली पाहिजे यासाठी रसिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तमाशामध्ये नवीन कलावंत कोणी यायला पाहत नाही. शिक्षणाच्या अभावाने काही महिला कलाकार येतात. पण, त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे, १९९८ साली काळू बाळूच्या तमाशात सांगलीला शिबिरे घेतली. त्यामध्ये मीही शिकले. सर्वांनीच शिबिरे घेतली पाहिजेत. त्यांना तमाशा समजला पाहिजे.

-सुरेखा पुणेकर

Web Title: That's why Narayangaon became the center of the tamasha in maharashtra lokmat reportaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.