....म्हणून राज्यभरातून पदाधिकाऱ्यांना बोलावलं : राज ठाकरेंनी केला उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 01:53 PM2019-12-20T13:53:27+5:302019-12-20T13:57:26+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संवाद शिबीराला पुण्यात सुरुवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेही कार्यक्रमस्थळी पोचले आहेत.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना शिबीराचा उद्देश स्पष्ट केला.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संवाद शिबीराला पुण्यात सुरुवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेही कार्यक्रमस्थळी पोचले आहेत.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना शिबीराचा उद्देश स्पष्ट केला. मागच्या दीड महिन्यात जो बिन पैशांचा तमाशा झाला, त्याविषयी पदाधिकाऱ्यांकडे काय आऊटपुट्स आहेत ते विचारायला त्यांना बोलावलं आहे अशी माहिती त्यांनी दिली.
विधानसभा निवडणुकींनंतर ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला नव्हता. त्यातच शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला ठाकरे यांनी पाठिंबा आणि विरोध न करता तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे त्यांची पक्षांतर्गत आणि राजकीय भूमिका काय आहे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. अखेर भूमिका स्पष्ट करणे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याकरिताच आजपासून ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
आज मनसेचे राज्यभरातील तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे शिबीर संपन्न होणार आहे तर उद्या डेक्कन जिमखाना येथे मनसेचे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडणार आहे. हे दोनही कार्यक्रम निमंत्रित कार्यकर्त्यांसाठी असून बैठकीत मोबाईल घेऊन जाण्यासही बंदी आहे. आज ठाकरे यांनी राजकीय मुद्द्यांवर अधिक बोलण्यास नकार दिला असला तरी लवकरच या सर्व मुद्दयांवर बोलू असेही त्यांनी स्पष्ट केले.