पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघाताचा बनाव फसला अन् खुनाचे गूढ उकलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 03:02 PM2022-08-03T15:02:57+5:302022-08-03T15:04:46+5:30
भिगवण पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक...
भिगवण : शेतातील ट्राॅलीच्या लोखंडी प्लेट चोरल्याच्या संशयातून अनोळखी इसमास लोखंडी टाॅमीने तोंडावर, कपाळावर मारहाण करीत त्याचा खून करीत पुणे-सोलापूर महामार्गावरील पोंधवडी गावच्या हद्दीत अपघात झाल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. कोणताही पुरावा नसताना खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या भिगवणपोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून करणारा आरोपी आकाश वामन काळोखे (वय २३, रा. देहूगाव विठ्ठलवाडी, ता. हवेली) असे आहे. खून झालेल्याचे नाव अरुणसिंह (वय ५३, रा. बब्बनसिंह गाव भदोरा, आझमगढ, उत्तर प्रदेश) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर महामार्गावरील पोंधवडी गावच्या हद्दीत अनोळखी मृतदेह आढळून आला होता.
घटनास्थळी पाहणी केली असता प्रथमदर्शनी अपघात झाल्याचे दिसून येत होते. मात्र तरीही भिगवण पोलिसांनी आपले कसब पणाला लावीत तपास करून हा अपघात नसून खून असल्याचा तपास केला आणि खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. १५० किलोमीटर अंतरावरील देहूगाव येथे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अपघाताचा बनाव उघडकीस आणण्यात अखेर भिगवण पोलिसांना यश मिळाले.
भिगवण पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी दिलीप पवार, उपनिरीक्षक सुभाष रूपनवर, पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलानी, अक्षय कुंभार, गणेश पालसांडे या पथकाने केली.