‘लाडक्या बहिणीं’चे खाते सायबर भामट्यांकडून साफ! पुण्यातील महिलेची फसवणूक, नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 01:31 PM2024-08-22T13:31:00+5:302024-08-22T13:31:09+5:30

हॅलाे, नमस्कार! मी बँकेतून बोलत आहे, तुमच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाली, पण काही कारणांमुळे ती अडकली - असा फोन आल्यास सावध व्हा

The account of ladki bahin yojana was cleared by the cyber criminals Cheating of a woman in Pune what really happened | ‘लाडक्या बहिणीं’चे खाते सायबर भामट्यांकडून साफ! पुण्यातील महिलेची फसवणूक, नेमकं काय घडलं

‘लाडक्या बहिणीं’चे खाते सायबर भामट्यांकडून साफ! पुण्यातील महिलेची फसवणूक, नेमकं काय घडलं

नम्रता फडणीस

पुणे : हॅलाे, नमस्कार! मी बँकेतून बोलत आहे, तुमच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाली आहे; पण काही कारणांमुळे ती अडकली आहे. तुम्हाला एक ओटीपी क्रमांक येईल. ताे सांगा. म्हणजे योजनेत अडकलेली रक्कम तातडीने मिळेल, असे सांगितले जाते. यावर विश्वास ठेवून महिलाबँक खात्याशी निगडित सर्व माहिती आणि ट्रान्झेक्शनचा ओटीपी देतात अणि तिथेच फसतात. अशाच प्रकारची घटना दोन दिवसांपूर्वी पुण्यात घडली असून, महिलेच्या खात्यातून तब्बल ७० हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी काढल्याचे समोर आले आहे. सध्या ही योजना सायबर चोरट्यांच्या रडारवर असून, या योजनेतून फसवणुकीचा नवा फंडा चोरट्यांनी शोधला आहे. राज्यात या योजनेच्या नावाखाली फसवणुकीच्या दिवसाला ८ ते १० तक्रारी येत असल्याचे सायबर तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

सध्या राज्यभरातून मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. राखी पौर्णिमेपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही महिला पैसे जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नेमकी हीच बाब हेरून सायबर चोरट्यांनी या योजनेलाच लक्ष्य केले आहे. महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे; पण काही कारणाने अडकली आहे, अशा भूलथापा मारत या योजनेसाठी तुम्हाला तुमचे ऑनलाइन बँकिंग लॉगिन करावे लागेल किंवा तुमच्याच मोबाइलमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आहे, असे सांगत, एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. सायबर चोरट्यांनी सांगितल्यानुसार महिलांनी कृती केल्यास त्यांच्या खात्यातून रक्कम लंपास केली जात आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाखाली होणाऱ्या फ्रॉडपासून महिलांनाे, सावध राहा, असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.

असे होतात ‘स्कॅम’

१) फिशिंग पेज लिंक - या योजनेसाठी तुम्हाला तुमचे ऑनलाइन बँकिंग लॉगिन करावे लागेल, असे सांगून हे सायबर चोरटे हुबेहूब आपल्या बँकेसारख्या दिसणाऱ्या; पण खोट्या वेबसाइटची लिंक पाठवतात, त्यावर आपण आपला आयडी पासवर्ड टाकला की, ती माहिती चोरट्याला मिळते.
२) ॲप डाउनलोड - तुमच्याच मोबाइलमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आहे, असे सांगितले जाते. त्यावर उपाय म्हणून एक ॲप डाउनलोड करायला सांगितले जाते. हे ॲप स्क्रीन शेअरिंगचे असल्याने मोबाइलवर जे काही सुरू असते ते चोरट्याला दिसते. तसेच त्याला ओटीपी, पासवर्डसुद्धा दिसतात. योजनेची नोंदणी, चौकशी आणि इतर तांत्रिक मदत केवळ अधिकृत ठिकाणीच करावी. बँकेसंबंधी कोणतीही तक्रार किंवा चौकशी बँकेत जाऊन प्रत्यक्ष करावी.

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. लिंकवर चुकून क्लिक झाल्यास त्वरित ते पेज सोडा, त्यावर माहिती भरू नका. कोणतेही अनोळखी ॲप मोबाइलमध्ये टाकू नका. कोणत्याही प्रकारचे कस्टमर केअरचे नंबर गुगलवर सर्च करू नका. कोणत्याही प्रकारची शंका आल्यास अथवा फसवणूक झाल्यास त्वरित तज्ज्ञांची मदत घ्या; अथवा सायबर पोलिस स्टेशनला जा. - ओंकार गंधे, सायबरतज्ज्ञ अणि संस्थापक, सायबर साक्षर

३ लाखांच्या आतील रकमेच्या तक्रारी घेण्यास पोलिसांचा नकार 

पुण्यातील ज्या महिलेचे ७० हजार रुपये गेले, त्याबाबत महिला पोलिस स्टेशनमध्ये गेली असता तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. कारण सायबर पोलिस स्टेशनमध्ये ३ लाख रुपयांच्या आतील फसवणुकीच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत. हा राज्यभरात अलिखित नियम आहे. आम्हाला लगेच कुठल्या ठिकाणाहून फोन आला होता ते कळते. या महिलेला बिहार येथून फोन आला होता. महाराष्ट्रातून पोलिस बिहारला जाणार मग तिथून आरोपी पकडून आणणार. त्याला महिना लागतो आणि राज्य शासनाला यासाठी दोन लाख रुपये खर्च येतो. म्हणून साधारणपणे दोन ते अडीच लाख रुपयांपुढील तक्रारीच पोलिसांना घेणे परवडते, असे सायबरतज्ज्ञ ओंकार गंधे यांनी सांगितले.

Web Title: The account of ladki bahin yojana was cleared by the cyber criminals Cheating of a woman in Pune what really happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.