ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्राँपर्टी बाबतचा तपास करणार
By नम्रता फडणीस | Published: November 29, 2023 06:19 PM2023-11-29T18:19:29+5:302023-11-29T18:20:03+5:30
भूषण पाटील, हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे आणि इब्राहम शेख यांची रवानगी कारागृहात
पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील, हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे आणि इब्राहम शेख यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.पंत, लोहारे आणि शेख यांचे बँक डिटेल्स पोलिसांना मिळाले आहेत. त्यांच्या बँक बँलन्ससह प्राँपर्टी बाबतचा तपास करायचा आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची गरज नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे त्यांची पोलिस कोठडी राखून ठेवत तिघांसह भूषण पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हयात भूषण पाटील, हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे आणि इब्राहम शेख हे चौघे पोलिस कोठडीत होते. त्यांची कोठडी बुधवारी संपल्याने त्यांना दुपारी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे, इब्राहम शेख यांच्या ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स) मधून महत्वाची माहिती मिळाली आहे. मात्र, ते तपासाला सहकार्य करत नाहीत. या तिघांचे बँक ‘डिटेल्स’ मिळाले आहेत. त्याचाही तपास बाकी आहे. तसेच, इब्राहम शेख हा नागपूर येथील अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात फरार होता, त्याचाही तपास करणे बाकी आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र बुधवारी या चौघांसाठी पोलिस कोठडीची मागणी न करता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.