आरोपीने पळून जाण्यासाठी २० फुटांच्या भिंतीवरून उडी घेतली खरी पण...,
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 09:57 AM2023-03-20T09:57:17+5:302023-03-20T09:57:36+5:30
न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याची तयारी केल्यावर दुपारच्या जेवणाच्या वेळेत पळून जाण्याचा आरोपीचा प्रयत्न
पुणे : कोरोनाकाळात जामिनावर सुटका झाल्यानंतर तो पुन्हा शिक्षा भोगायला आलाच नाही. शेवटी अजामीनपात्र वाॅरंट जारी केल्यावर तो न्यायालयात हजर झाला. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याची तयारी केली. तेव्हा दुपारच्या जेवणाच्या वेळेत त्याने आरोपीच्या पिंजऱ्यातून उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. शिवाजीनगर न्यायालयातून बाहेरील २० फुटांच्या उंच भिंतीवरून त्याने उडी घेतली खरी; पण तेथे लावलेल्या पत्र्यावरून पळून जाताना तो जखमी झाला आणि पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडला.
दीपक शिवाजी जाधव (वय २८, रा. शारदा कॉलनी, कात्रज), असे त्याचे नाव आहे. त्याला २०१७ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती. दोन वर्षांपूर्वी कोविडच्या अनुषंगाने तो रजेवर सुटला होता. त्यानंतर तो कारागृहात न परतल्याने त्याच्याविरुद्ध दोन अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तो १७ मार्च रोजी स्वत: होऊन न्यायालयात हजर झाला. त्याला न्यायालय येरवडा तुरुंगात पाठविणार होते. न्यायालयाने तसे पोलिसांना सांगितले. दीपक जाधव याला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते.
दुपारी जेवणाची सुटी झाल्याने सर्व कर्मचारी बाहेर गेले. तेव्हा दोन पोलिस हवालदार बंदोबस्तावर होते. तेव्हा जाधव हा आरोपीच्या पिंजऱ्यामधून उडी घेऊन बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ पोलिस पाठलाग करू लागले. तेव्हा त्याने तेथील २० फूट उंचीच्या भिंतीवरून उडी घेतली. पळून जात असताना न्यायालयात सुरू असलेल्या नवीन बांधकामाकरिता लावलेल्या पत्र्याच्या शेडवरून पुन्हा उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या दोन्ही हाताच्या तळव्याला शेडचा पत्रा लागून तो जखमी होऊन खाली पडला. तेव्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करून उपचारासाठी ससूनला नेण्यात आले तेथून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.