आरोपी वकील म्हणतात, शरद मोहोळचा खून केलेल्या आरोपींना करायचे होते सरेंडर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 12:16 PM2024-01-07T12:16:02+5:302024-01-07T12:16:15+5:30
गेल्या १५ वर्षांपासून वकिली व्यवसाय करत असून आम्ही काही केले नाही, असे सांगून आरोपी वकील कोर्टात रडायला लागला
पुणे : ‘‘आम्हाला आरोपींचा फोन आला की, त्यांनी खून केला असून, त्यांना सरेंडर व्हायचे आहे. त्यानुसार, आम्ही आरोपींना भेटून सरेंडर होण्याचाच सल्ला देत होतो. आम्ही पोलिसांना फोनही केला. तेव्हा गुन्हे शाखेचे पोलिस पथक तिथे आले. त्यांनाही आम्ही हेच सांगत होतो; पण पोलिसांनी आमचे ऐकले नाही,’’ असे शरद मोहोळ खून प्रकरणात अटक वकिलांनीन्यायालयात सांगितले. दोन्ही आरोपी वकील बार असोसिएशनचे सदस्य असून, त्यांना साेमवार (दि. ८) पर्यंत, तर उर्वरित सहा आरोपींना बुधवार (दि. १०) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगार शरद मोहोळवर गोळीबार करून खून केल्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित उर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड.रवींद्र वसंतराव पवार, ॲड.संजय रामभाऊ उढाण यांना अटक केली. या आठही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.सी. बिराजदार कोर्टात शनिवारी (दि. ६) हजर करण्यात आले. त्यावर दोन आरोपी वकिलांसाठी बार असोसिएशनच्या सदस्यांसह इतर वकिलांची न्यायालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
हा पूर्वनियोजित कट होता. या कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? बेकायदा शस्त्र कुणी पुरविली? उद्देश काय? याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी केला. यात पोलिसांनी आरोपींना चौदा दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यावर वकिलांच्या बाजूने ॲड.एन.डी. पाटील, ॲड.एच.व्ही. निंबाळकर, ॲड.शहा आणि ॲड.विश्वजीत पाटील यांनी बाजू मांडली. वकील हे कोणत्याही आरोपींची केस घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना आरोपींना भेटावे लागते.
आरोपींना काही सूचना द्याव्या लागतात किंवा सल्लेही द्यावे लागतात. त्यामुळे त्यांना पोलिसांनी आरोपी करण्याची गरज नाही. ते तपासाचा भाग होत नाहीत. त्यामुळे दोन वकिलांना पोलिस कोठडी देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, न्यायालयाने वकिलांचाही गुन्ह्यातील सहभाग सिद्ध होणे आवश्यक असल्याचे सांगत वकिलांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, न्यायालयात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता. पहिल्या मजल्यावरील बिराजदार कोर्टाच्या बाहेरचा भाग टेबल टाकून बंद केला होता. प्रवेशद्वारावर पोलिसांची टीम तैनात केली होती. कुणालाही त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये सोडण्यात येत नव्हते.
आरोपी वकिलाला अश्रू अनावर
गेल्या १५ वर्षांपासून वकिली व्यवसाय करीत आहे. आम्ही काही केलेले नाही, असे सांगतानाच आरोपी वकील कोर्टात रडायला लागला. तेव्हा तुम्ही काहीही केले नसेल तर घाबरण्याची गरज नाही, असे सांगून न्यायालयाने त्यांना आश्वस्त केले.
बार असोसिएशनच्या सदस्यांना बाहेर जाण्याची कोर्टाची सूचना
आरोपींना आणण्यापूर्वी कोर्टात बार असाेसिएशनचे सदस्य आणि वकिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे आरोपींना कोर्टात येणे मुश्कील झाले होते. त्यावर न्यायालयाने वकिलांना बाहेर जाण्याची सूचना केली. तरीही गर्दी हटली नाही. हे पाहून न्यायाधीशांनी बार असोसिएशनच्या विरोधात ऑर्डर देण्याबाबत पाऊल उचलले. तेव्हा काही सदस्यांनी न्यायाधीशांना थांबवित सदस्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्याला प्रतिसाद देत काही वकील मंडळी बाहेर गेली. त्यामुळे आरोपींचा कोर्टात येण्याचा मार्ग मोकळा झाला.