दहशत माजवित ३ तरुणांवर कोयत्याने हल्ला, आरोपींच्या मुसक्या आवळल्या; गोऱ्हे बुद्रुकमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 07:57 PM2024-03-08T19:57:45+5:302024-03-08T19:58:43+5:30
आत्तापर्यंत आठ आरोपींना हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील दोनजण विधीसंघर्षित आहेत....
- कल्याणराव आवताडे
धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता परिसरातील गोऱ्हे बुद्रुक येथे दहा ते पंधरा तरुणांनी भर रस्त्यात तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना नुकतीच समोर आली. या हल्ल्यात नचिकेत संजय जगताप, ऋषिकेश दिलीप जगताप, निलेश हिरामण शहा हे तीन तरुण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत आत्तापर्यंत आठ आरोपींना हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील दोनजण विधीसंघर्षित आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी गणेश खुडे हा मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात असताना गणेशला नचिकेत जगताप याने अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली होती. याचा राग मनात धरून गणेश याने इतर दहा ते पंधरा जणांना बोलावून घेतले. तसेच गोऱ्हे बुद्रुक येथे जाऊन जगताप व इतर दोन जणांवर हल्ला केला. यात जगताप याच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. तसेच आरोपींना शोधण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून रवाना केली.
अवघ्या चोवीस तासांत गणेश राजू खुडे (वय: २४वर्षे, रा. धायरी फाटा, वडगाव खुर्द) सोमनाथ गुलाब पवार (वय: १९ वर्षे, रा. मारुती मंदिराच्या मागे, धायरी) यश चंद्रकांत जवळकर (वय: १९ वर्षे, रा. खानापूर, ता. हवेली) अनिरुध्द अमित ठाकुर (वय: १९ वर्षे, रा. खडकचौक, धायरी) ओंकार संतोष पोळेकर (वय: १९ वर्षे, रा. भैरवनाथ मंदीराच्या समोर, धायरी) हमजा कमरअली शेख (वय: २२ वर्षे, रा. जिजाऊ संकुल, भैरवनाथ मंदीर, धायरी) व इतर दोन विधीसंघर्षित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे हवेली पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, यांच्या सूचना व आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले, हवेली ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, पोलीस हवालदार तोडकर, पोलीस नाईक गायकवाड, धनवे, पोलीस अंमलदार चौधरी, काळे, शिंदे आदींच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार करीत आहेत.
गुंडांना राजाश्रय मिळतोय: सुप्रिया सुळे
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती आहे, याचा हा नमुना आहे. गुंडांना राजाश्रय मिळत असून यामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र दहशतीखाली जगावे लागत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच, गृहखात्याने या घटनेची तातडीने दखल घेऊन अशा पद्धतीने दहशत माजविणाऱ्यांना कठोरात कठोर शासन करण्याची गरज आहे, अशी मागणीही सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
फिर्यादी आहेत सराईत गुन्हेगार...
या घटनेतील फिर्यादी जगताप याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी यांच्यावरही पोलिसांकडून मागील गुन्ह्यांबाबत कारवाई होण्याची शक्यता आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडत असेल तर तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांनी केले आहे.