Pune: डॉक्टरचे अपहरण करून २० लाख लुटणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 02:36 PM2023-08-25T14:36:19+5:302023-08-25T14:37:04+5:30
याबाबत डॉ. प्रदीप मारुती जाधव (रा. भेकराई नगर, फुरसुंगी ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे...
लोणी काळभोर (पुणे) : फुरसुंगी येथील एका पशुवैद्यकीय डॉक्टरचे अपहरण करून २० लाख रोख रक्कम आणि २ लाख रुपयांचे सोने लुबाडणाऱ्या १ महिला, १ तृतीयपंथी आणि चार तरुण अशा सहा आरोपींना लोणी काळभोरपोलिसांनी अटक केली आहे. याबाबत डॉ. प्रदीप मारुती जाधव (रा. भेकराई नगर, फुरसुंगी ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राहुल दत्तु निकम (वय २७, रा. मु. पो. शहा, ता. इंदापुर, जि. पुणे) त्याची प्रियसी विद्या नितीन खळदकर (वय ३५, रा. ढगेमळा, कुर्डुवाडी रोड, ता. बार्शी जि. सोलापुर) हिच्यासह राहुलचे सहकारी माऊली ऊर्फ ज्ञानदेव महादेव क्षिरसागर, नितीन बाळु जाधव, सुहास साधु मारकड, संतोष धोंडीबा गोंजारी ऊर्फ राणी पाटील (तृतिय पंथी) या सहा जणांना मोठ्या शिताफिने अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रेनॉल्ट कंपनीची क्विड मारुती कार, बजाज मोटरसायकल, स्पोर्ट बाईक, तक्रारदार यांचा फोडलेला मोबाईल, तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले सहा मोबाईल, सोन्याचे दागिने व लुबाडलेल्या रकमेपैकी बारा लाख रुपये रोख अशी एकूण २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रदीप जाधव हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. ते आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत भेकराईनगर येथे राहत असून त्यांची पहिल्या पत्नीशी घटस्फोटाची केस न्यायालयात चालू आहे. बुधवारी (दि.९) त्यांना एका इसमाने अज्ञात मोबाईल नंबर वरून कॉल करून कुत्रे आजारी असल्याचे सांगून वडकी येथील एका निर्जन स्थळी बोलून घेतले आणि त्या ठिकाणावरून काही जणांनी त्यांचे नंबर नसलेल्या एका चारचाकीतून अपहरण करून त्यांना वाघापूर येथील वनीकरणात मारहाण करण्यात आणले. मारहाण करताना आरोपींनी डॉक्टरांना तुमच्या पत्नीने व मेव्हण्याने तुम्हाला मारण्याची सुपारी दिली असल्याचे सांगितले. डॉ. जाधव यांना दोन बायका असून पहिल्या पत्नीशी त्यांची न्यायालयात घटस्फोटाची केस चालू आहे तर डॉक्टर हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसह फुरसुंगी येथील भेकराईनगर येथे राहत आहेत.
न्यायालयाने त्यांना पहिल्या पत्नीला २५ लाखाची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम देण्यासाठी डॉक्टरांनी जुळवाजुळव करून रक्कम घरी आणून ठेवली होती. दरम्यान डॉक्टरांची दुसरी पत्नी तिच्या माहेरी बार्शी येथे गेली होती. त्या ठिकाणी डॉक्टरांनी घरात ठेवलेल्या रकमेची माहिती तिच्या भावजय विद्या नितीन खळदकर हिला समजली. विद्याचे इंदापूर येथील राहुल निकम याच्याशी प्रेम संबंध आहेत. तिने तिचा प्रियकर राहुल निकम आणि त्याचे साथीदार यांना एकत्रित करून डॉक्टरांना लुटण्याचा कट रचला. अपहरणाच्या तीन दिवस अगोदर तिने इतर सहकाऱ्यांना डॉक्टरांचे घर दाखवले. विद्या ही डॉक्टरांची नातेवाईक असल्याने तिने प्रत्यक्षपणे सामील न होता अपहरणाचे नियोजन केले. या घटनेत आरोपींनी कोणताही पुरावा पाठीमागे राहणार नाही याची काळजी घेऊन नियोजनबद्ध कट रचला असल्याने लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपूर्ण व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आरोपींना अटक केली आहे.