एकतर्फी प्रेमातून तरूणीचा खून करणाऱ्या आरोपीने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 02:27 PM2022-11-10T14:27:04+5:302022-11-10T14:27:12+5:30
गुरवारी सकाळी प्रतीकने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ जाऊन स्वतःला संपवून घेतले
पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करुन पसार झालेल्या आरोपी तरुणाने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ स्वतःचे जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रतीक ढमाले असे या आरोपीचे नाव आहे. श्वेता रानवडे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. बुधवारी दुपारी रानवडे आणि तिची बहीण औंध भागातून निघाली होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या प्रतीकने तिच्यावर चाकूने वार केले होते. या घटनेनंतर घबराट उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्रतीकच्या मागावर पोलिसांची पथके होती. गुरवारी सकाळी प्रतीकने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ जाऊन स्वतःला संपवून घेतले.
औंधमध्येही होतं घडलं असं काही..
प्रेम प्रकरणात नात्यातीलच तरुणीने दिलेला नकार तरुणाला पचविता आला नाही. त्याने प्रेयसीच्या पोटात चाकूने वार करून तिचा खून केला. या प्रकाराने औंध परिसरात एकच खळबळ उडाली होती. खून केल्यानंतर हा तरुण पळून गेला होता. श्वेता रानवडे (वय २२, रा. औंध) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी प्रतीक ढमाले, त्याचे वडील किसन ढमाले (वय ५०), प्रतीकचा मित्र रोहित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्वेताची आई दीपाली रानवडे (वय ४६, रा. सिद्धार्थनगर, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सिद्धार्थनगरमध्ये बुधवारी अडीच वाजता घडली.
अधिक माहितीनुसार, श्वेता व प्रतीक ढमाले यांच्यामध्ये ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नास मान्यता दिली होती. मात्र, गेल्या वर्षीपासून प्रतीक हा श्वेतावर संशय घेऊन त्रास देऊ लागला होता. त्यामुळे श्वेताने त्याला नकार दिला. प्रतीकचे वडील व मित्र तिच्यावर दबाव टाकून धमकी देत होते. श्वेता तिच्या आईबरोबर सांगवी येथील सोनाराकडे गेली होती. तेथून त्या दुपारी घरी परत आल्या. तेव्हा पार्किंगमध्ये प्रतीक तिच्याजवळ आला. त्याने चाकूने श्वेताच्या पोटात, छातीवर, हातावर सपासप वार केले. त्यानंतर तो पळून गेला. गंभीर जखमी असलेल्या श्वेताला रुग्णालयात नेले असता तेथे तिचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य पाहता सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपयुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी भेट दिली. प्रतीकचा शोध घेण्यात येत आहे.