कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई योग्य
By नम्रता फडणीस | Published: November 26, 2024 09:25 PM2024-11-26T21:25:13+5:302024-11-26T21:25:13+5:30
विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांचा आयोगासमोर अंतिम युक्तिवाद सुरु
पुणे : कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळल्यानंतर झालेली जाळपोळ ही एकाजागी न होता शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगावसह अन्य ठिकाणी देखील झाली. मात्र, पोलिसांनी जातीय दंगली कशा हाताळायच्या त्याच्या नियमावली प्रमाणेच कारवाई केली आहे.
तसेच लाखो लोक असूनही पोलिसांनी कोणतीही जीवित हानी होऊ दिली नाही, इतकी गंभीर परिस्थिती असतानाही पेरणेफाटा येथे भाविक पोलिसांमुळेच व्यवस्थित दर्शन घेऊ शकत होते. त्यामुळे पोलीसांनी केलेली कारवाई योग्य होती अशा मुद्द्यांवर विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी चौकशी आयोगासमोर मंगळवारी ( दि.28) युक्तिवाद केला. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार उसळला होता.
या प्रकरणी राज्य सरकारने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त न्यायमूर्ती जे. एम. पटेल आणि माजी सचिव सुमीत मलिक यांच्या चौकशी आयोगाची स्थापना केली होती. या आयोगापुढे ५३ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, आयोगाचे पुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम युक्तिवाद दाखल करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार विशेष सरकारी वकील हिरे यांनी मंगळवारी (दि. २६) चौकशी आयोगासमोर अंतिम युक्तिवादाला सुरूवात केली.
कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळल्यानंतर त्याचे पडसाद अन्य ठिकाणी देखील उमटले. शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव सह अन्य भागात ही जाळपोळ पसरली होती. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक त्यावेळी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले होते. मात्र, पोलीसांनी योग्य ती कारवाई करत जाळपोळ आटोक्यात आणली. लाखो लोक असूनही कोठेही चेंगरा-चेंगरीची घटना किंवा जीवित हानी होऊ दिली नाही. महिला, लहान मुलांना देखील सुखरूप सोडवले. आंदोलनावेळी अचानक हल्ला झाल्यामुळे एका तरूणाचा मृत्यू झाला होता. मात्र, या घटनेचा कोणताही परिणाम होऊ न देता पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली, असा युक्तिवाद अॅड. हिरे यांनी केला. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी शुक्रवार (दि. २९) पर्यंत सुरू राहणार आहे, असेही अॅड. हिरे यांनी सांगितले.