अपघातानंतर प्रशासनाला जाग! उजनी धरणात आता परवानाधारक बोटींनाच मिळणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 12:11 PM2024-05-25T12:11:06+5:302024-05-25T12:14:07+5:30
रस्ते मार्गाने न जाता कमी अंतरात पोहोचता यावे यासाठी करमाळा तालुक्यामधील काही प्रवाशांनी बोटीचा आधार घेतला...
पुणे : उजनी धरणात बोट उलटून सहाजण बुडाल्याची घटना घडल्यानंतर येथील बोटींना कायदेशीर परवाना देण्यासंदर्भात लवकरच नियमावली तयार करू, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. या नियमावलीनंतर केवळ परवानाधारक बोटींनाच उजनी धरणात प्रवेश दिला जाईल. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रस्ते मार्गाने न जाता कमी अंतरात पोहोचता यावे यासाठी करमाळा तालुक्यामधील काही प्रवाशांनी बोटीचा आधार घेतला. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोट हेलकावे घेऊ लागली व त्यातच सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी असून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत हा अहवाल मिळण्याची अपेक्षा असून यानंतर उजनी धरणात केवळ परवानाधारक बोटीनेच प्रवेश मिळेल, असे दिवसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
अवैध प्रवासी वाहतूक बेततेय जीवावर
उजनी धरणात मच्छीमारीसाठी बोटींना जलसंपदा विभागाकडून परवानगी दिली जाते. मात्र, त्यातून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याने ती प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळेच मुंबई पोलिस कायद्यानुसार बोटींना परवानगी देण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल. सातारा जिल्ह्यात या संदर्भात नियमावली तयार करण्यात आली होती. त्याचा फायदा दिसून आला. त्याच पद्धतीने उजनी धरणातदेखील केवळ परवानाधारक बोटींनाच प्रवेश देण्यात येईल. बोटचालकांना काळे जॅकेट देऊन त्यांची नोंदणी करण्यात येईल. बोटींचा वापर केवळ मच्छिमारीसाठी होत असल्याची पडताळणी देखील केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.