"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 08:06 PM2024-05-23T20:06:21+5:302024-05-23T20:09:51+5:30
जामीन मिळाल्यानंतर अपघात प्रकरणातील आरोपीने घरी जाऊन एक रॅप साँग केल्याचा दावा केला जात आहे.
Pune Accident ( Marathi News ) : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या कार अपघाताप्रकरणी दिवसागणिक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप आणि पोलीस प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेवरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात असतानाच बेदरकारपणे कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अपघातानंतर काही तासांतच जामीन मिळाल्यानंतर सदर आरोपीने घरी जाऊन एक रॅप साँग केल्याचा दावा केला जात आहे. या रॅप साँगमध्ये अनेक आक्षेपार्ह शब्द असून दोन जणांचे प्राण गेल्यानंतरही आरोपीला कसलाही पश्चाताप झाला नसल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आरोपीने अपघाताच्या घटनेवर एक रॅप साँग बनवल्याचं दिसत आहे. यामध्ये त्याने म्हटलं आहे की, "मिली बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल...चार यार मेरे साथ, सिधे फाड देते *&%...करके बैठा मै नशे, इन माय पोर्शे...सामने आया कपल मेरे, अब वो है निचे, साऊंड सो क्लिंचे...सॉरी गाडी चढ आप पे, १७ साल की उमर, पैसे मेरे बाप पे...1 दिन में मिल गयी मुझे बेल, फीर से दिखा दुंगा सडक पे खेल....प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार."
दरम्यान, अल्पवयीन आरोपीच्या नावाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या सत्यतेची 'लोकमत डिजिटल' पुष्टी करत नाही. आरोपीच्या कुटुंबीयांकडून हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर हा व्हिडिओ एआय टूलचा वापर करून तयार केला असू शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असून आरोपीने जामीन मिळाल्यानंतर खरंच असे रॅप साँग केले होते का, याबाबत आता पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपीचा जामीन रद्द, कोर्टात काय घडलं?
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या बाबतीतील बालहक्क न्यायालयाच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर, या न्यायालयाने बुधवारी आपला जुना निर्णय बदलून, अल्पवयीन मुलाला १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयाने रविवारी ‘बाळा’ला काही अटींच्या आधारे जामीन मंजूर केला होता. यावर प्रचंड रोष व्यक्त झाला होता. अशातच आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केला आणि पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केले. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बालहक्क न्यायालयाने आता पूर्वीचा निर्णय बदलून नवे आदेश दिले. अपघातावेळी ते 'बाळ' दारू प्यायले होते, हे न्यायालयाला पटवून देण्यात पुणे पोलिस यशस्वी झाले. हे ‘बाळ’ दारूच्या नशेत होते, हे सांगण्यासाठी पुणे पोलिसांनी बाळानं कोझी किचन या हॉटेलमध्ये भरलेले ४८ हजार रुपयांचे बिल न्यायालयासमोर सादर केले. ज्यामध्ये या ‘बाळा’ने दारूसाठी पैसे मोजल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर हे ‘बाळ’ दारू पीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आले.