Women's Day Special: पुणे मेट्रो संचलनाची धुरा महिलांच्या खांद्यावर; मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 10:42 AM2023-03-08T10:42:09+5:302023-03-08T10:42:24+5:30
महिला स्टेशन ऑपरेशन्सपासून ते टेंडर प्रक्रिया पार पडेपर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या निभावतात
राजू इनामदार
पुणे : सुभ्रद्रा मोरे, दर्शना नंदनवार, शिवानी पवार, सुमेधा मेश्राम, श्रद्धा सरवदे...! या सर्व महिलांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे या सर्व महिला पुणेमेट्रोत मोठ्या हुद्द्यांवर काम करत आहेत. स्टेशन ऑपरेशन्सपासून ते टेंडर प्रक्रिया पार पडेपर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या त्या निभावतात. ही कामे नेहमीच्या कामांपेक्षा वेगळी तर आहेतच, शिवाय तुमची कसोटी पाहणारीही आहेत. मात्र त्या अगदी सहजपणे ही कामे करत आहेत.
उच्चशिक्षित असलेल्या या महिलांमध्ये कुणी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीधर, द्विपदवीधर आहेत. तसेच एम.टेक., बी. टेक. अशा वेगवेगळ्या विभागात त्यांनी स्पेशलायझेशनही केलेले आहे. त्यातील काहीजणींही ही पहिलीच नोकरी, तर काहीजणींनी याआधी अहमदाबाद, दिल्ली व अन्य राज्यांतील मेट्रोच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे. अतिशय आत्मविश्वासाने त्या पुणे मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यापासून कार्यरत आहेत. इतक्या उत्तमपणे त्या हे काम करतात की, मेट्रोच्या कामाचा प्रचंड अनुभव असलेले महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षितही चकित होतात.
दर्शना नंदनवार या मेट्रोच्या विविध विभागांतील निविदा प्रक्रियेचे काम पाहतात. हे काम अतिशय क्लिष्ट आहे, इतके की निविदेतील अटी, शर्ती, नियम ठरवण्यापासून ते कोणत्याही कायदेशीर कटकटीत अडकणार नाही इथपर्यंत. मेट्रो सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी तब्बल ७ हजार करोड रुपयांची टेंडर्स हातावेगळी केली आहेत. तीसुद्धा कोणत्याही मोठ्या समस्येविना.
शिवानी पवार पुणे मेट्रोचे स्वारगेट ते शिवाजीनगर या भुयारी मार्गाचे काम पाहतात. त्या या कामाच्या प्रमुख आहेत. या मार्गावरील भूयार खोदण्यापासून ते तिथे रूळ वगैरे टाकून विद्युत व्यवस्था तयार करण्यापर्यंतचे सगळे काम त्यांच्या अखत्यारित येते. दररोज एक इश्यू तयार होतो व तो सोडवला जातो, त्या अर्थाने हे एक आव्हानात्मक काम आहे, असे त्या सांगतात.
सुमेधा मेश्राम या स्टेशन ऑपरेटिंग विभागाच्या सहायक व्यवस्थापक आहेत. म्हणजे मेट्रो मार्गावरचे प्रत्येक स्टेशन व तिथली सर्व ऑपरेशन्स त्या व त्यांचे सहकारी पाहतात. हे काम खूपच जबाबदारीचे आहे. थोडीशीही चूक त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे डोळ्यात तेल घालून सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवावे लागते. नागपूर मेट्रोमध्येही काम त्यांनी केले आहे.
श्रद्धा सरवदे या मेट्रोच्या ऑटोमॅटिक फेअर कलेक्शनच्या प्रमुख आहेत. आपण मेट्रोच्या स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिकीट काढण्यासाठीची म्हणून जी यांत्रिक व्यवस्था आहे तसेच तिकीट काढल्यानंतर ते यंत्रावरच टॅप करून आत प्रवेश करणे वगैरेसारखी ऑपरेशन्स त्यांच्या कामात आहेत. ही यंत्रणा बिघडली तर मेट्रोच बिघडली, असे म्हणता येईल इतकी ती महत्त्वाची आहे.
सुभद्रा मोरे या आर्किटेक्ट विभागाच्या प्रमुख आहेत. महामेट्रोच्या इमारती, स्टेशन्स यांची डिझाईन तयार करणे, त्यानुसार काम होते आहे की नाही, हे पाहणे याप्रकारचे काम ते व त्यांचे सहकारी करतात. त्या कर्नाटकमधील आहेत. गर्दीच्या ठिकाणची स्टेशन्स तयार करणे, हे काम खरोखरच आव्हानात्मक होते, मात्र याआधी मेट्रोत अहमदाबादमध्ये काम केल्यामुळे फार अवघड गेले नाही, असे त्यांनी सांगितले.
अग्निवा घोष या महामेट्रोच्या लिगल हेड आहेत. सर्व न्यायालयांमधील पुणे मेट्रोसंबधींचे खटले त्या पाहतात. त्याशिवाय वेगवेगळ्या संस्थांबरोबरचे सामंजस्य करार, मेट्रोच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील कायदेशीर गोष्टीही त्यांच्याच अखत्यारित येतात. त्यांना सध्या महामेट्रोमध्ये वन वुमन आर्मी असेच म्हटले जाते. त्या मूळच्या बंगालमधील आहेत. मेट्रोची ही त्यांची पहिलीच सर्व्हिस, मात्र आतापर्यंत एकाही खटल्याचा निकाल मेट्रोच्या विरोधात लागलेला नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य.