ढोल ताशांचा निनाद, पारंपारिक वाद्य, डीजेचा दणदणाट; पिंपरी चिंचवडमध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप
By विश्वास मोरे | Published: September 18, 2024 01:20 PM2024-09-18T13:20:03+5:302024-09-18T13:20:17+5:30
बाप्पा मोरयाचा जयघोष करत पिंपरी आणि चिंचवडकरांनी बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला
पिंपरी : अकरा दिवस विराजमान झालेल्या गणरायाला पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीने मिरवणुकीद्वारे मंगळवारी निरोप दिला. ढोल ताशांचा निनाद, पारंपारिक वाद्य, डीजेचा दणदणाट आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत पिंपरी आणि चिंचवड मधील मिरवणूक रंग भरू लागली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड आणि पिंपरी मधील गणेशोत्सव गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासारखे असते. सकाळपासूनच घरगुती गणेश विसर्जनासाठी शहरातील २६ घाटांवर गर्दी झाली होती. सायंकाळी चार नंतर घाटावरील गर्दी वाढू लागली. तसेच चिंचवड आणि पिंपरी येथील विसर्जन मार्गावरील चार नंतर वाहतूक कळवण्यात आली होती. रात्री आठ पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमाण कमी होते. मिरवणूक रंग भरू लागली आहे. महापालिका आणि पोलीस आयुक्तालाच्या वतीने पिंपरी येथील शगुन चौक आणि चिंचवड येथील चापेकर चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गणेश मंडळाचे स्वागत करण्यात येत होते त्यानंतर विसर्जनासाठी गणेश मंडळे पुढे पवना नदी घाटावर जात होती.
सकाळच्या टप्प्यामध्ये अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी जिजाऊ पर्यटन केंद्र घाटाची केली पहाणी केली. समवेत क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, आरोग्य विभाग प्रमुख सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे आदी उपस्थित होते. तसेच चिंचवड आणि पिंपरी येथील गणेश विसर्जन घाटांची पाहणी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केली. यामध्ये वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट, चिंचवड येथील बिरला पुलाजवळील घाट, पिंपरी येथील सुभाष घाटाचा प्रामुख्याने समावेश होता. यावेळी समवेत मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर आदी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने सर्व विसर्जन घाटांवर विसर्जन कुंड, निर्माल्य कुंडासह सुरक्षा विषयक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा आढावा अतिरिक्त आयुक्त इंदलकर यांनी यावेळी घेतला.
महापालिकेकडून गणेश मंडळाचे स्वागत
पिंपरी येथील कराची चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षामध्ये या चौकात आलेल्या मिरवणुकांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर आदी उपस्थित होते. चिंचवड येथील चापेकर चौकात देखील महापालिकेव्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. या चौकात आलेल्या मिरवणुकांचे स्वागत महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित आदी उपस्थित होते.