पुण्याच्या मंत्रिपदाचा फायदा कंत्राटदाराला न होता सामान्यांना व्हावा; सुळेंची मोहोळांवर जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 05:25 PM2024-06-10T17:25:23+5:302024-06-10T17:26:24+5:30
पुण्याला मंत्रीपद मिळालंय ही चांगली गोष्ट, मात्र आता कंत्राटदाराला त्याचा फायदा न होता सर्व सामान्य लोकांना व्हावा
पुणे: देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) पराभव झाला. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लाखांच्या फरकाने पराभव करून विजय मिळवला. तर पुण्यात मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांचा तेवढ्याच फरकाने पराभव करून विजय मिळवला. पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाची लॉटरी लागली. पुण्याला तब्बल २८ वर्षांनंतर केंद्रात मंत्रिपद मिळाले. त्यावरून सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे.
पुण्याला मंत्रीपद मिळाले आहे, चांगली गोष्ट आहे. मात्र आता कंत्राटदाराला त्याचा फायदा न होता सर्व सामान्य लोकांना व्हावा. तसेच केंद्राच्या आजच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी व्हावी, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. पुण्यात राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्ताने त्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुळे म्हणाल्या, पुण्यात रवींद्र धंगेकर यांनी मतदान झाल्यावर खूप काम केले. पोर्शे कारच्या प्रकरणात त्या कुटुंबाना न्याय मिळवून दिला. हे खरंच कौतुकास्पद आहे. महाविकास आघाडीचे आम्ही दोघे संसदेत असणार आहोत. पण धंगेकर आमच्यासोबत नसल्याची उणीव आम्हाला जाणवणार आहे. त्यांचा थोड्याच मतांनी पराभव झालाय, मात्र ते मागे हटणार नाहीत. ऑक्टोबरमध्ये ते पुन्हा आमदार होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुण्यात शनिवारी झालेल्या पावसावरुन सुप्रिया सुळेंनी प्रशासनावर जोरदार टीका केली. एक दिवसाच्या पावसात माझ्या माझ्या मतदारसंघात सिंहगड परिसरात 2 वेळा पाणी तुंबले. त्याला जबाबदार प्रशासन आणि हे खोके सरकार आहे. उद्या मी गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने पुणे शहराची झालेल्या दयनीय अवस्थेची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.