‘अवकाळी’चा मोठा फटका! २१ जिल्ह्यांतील तब्बल ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:05 AM2024-05-21T09:05:29+5:302024-05-21T09:07:05+5:30
सर्वाधिक १ हजार ७२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान गोंदिया जिल्ह्यात झाले आहे....
पुणे : राज्यात गेल्या आठवड्यावर सुरू असलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे २१ जिल्ह्यांमध्ये ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यात मुख्यत्वे फळपीके, भाजीपाला व उन्हाळी पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक १ हजार ७२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान गोंदिया जिल्ह्यात झाले आहे.
मॉन्सून अंदमानात दाखल झाला असून, राज्यातही पूर्व मोसमी पावसाने अनेक जिल्ह्यांत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांचे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा फटका राज्यातील २१ जिल्ह्यांमधील शेती पिकांना बसला आहे. कोकणातील आंबा, केळी, काजू, भात, नारळ, फणस तसेच भाजीपाला पिकांना बसला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये केळी, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, कांदा, मका, बाजरी अशा पिकांना याचा फटका बसला आहे, तर पुणे, सांगली, नगर या जिल्ह्यांमध्ये भाजीपाला तसेच फळपिकांचे माेठे नुकसान झाले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अवकाळीने कहर केला असून, उन्हाळी भातासह भाजीपाला व लिंबू, संत्रा या पिकांचे नुकसान झाले आहे.
राज्यातील २१ जिल्ह्यांमधील ६ हजार ६१६ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक १ हजार ७२२ हेक्टरी पिकांचे नुकसान गोंदिया जिल्ह्यात झाले आहे. त्या खालोखाल भंडारा जिल्ह्यात १ हजार ५२० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये ५१४, अकोला जिल्ह्यात ५०३, तर रायगडमध्ये ४५३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचवा व अंतिम टप्पा सोमवारी पार पडला असून, राज्यातील अन्य भागांमध्ये महसूल व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी पंचनामे करण्यात गुंतले आहेत.
जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)
ठाणे : १०७
पालघर : ३७३
रत्नागिरी : २६
रायगड : ४५३
सिंधुदुर्ग : २१
धुळे : ७२
नाशिक : ५१४
नंदुरबार : १२३
जाळगाव : ३०
पुणे : १७४
नगर : २९९
सांगली : ९
भंडारा : १५२०
नागपूर : २१
गोंदिया : १७२२
चंद्रपूर : १७७
बुलढाणा : ३०
अकोला : ५०३
वाशिम : १
अमरावती : ३८८
यवतमाळ : ५१
एकूण : ६,६१६