राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका आपल्यालाच बसलाय : आढळराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 02:37 PM2022-06-27T14:37:06+5:302022-06-27T14:39:27+5:30
तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा फटका कुणाला बसला असेल तर आम्हाला बसलाय, शिवसैनिकांना बसलाय, आढळराव पाटील यांचं वक्तव्य.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत असून मंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दिलीप लांडे हे ३८ वे आमदार त्यांच्या गटात गेल्यानंतर मंत्री उदय सामंत हेही गुवाहाटीला रवाना झाले होते. अनेक बंडखोर आमदारांनी काँग्रेस राष्ट्रवादी यांची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करावं अशी मागणी केली होती. दरम्यान, आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीदेखील राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका आपल्यालाच बसला असल्याचं वक्तव्य केलं आहे.
“या तालुक्यात सर्वात जास्त, तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा फटका कुणाला बसला असेल तर आम्हाला बसलाय, शिवसैनिकांना बसलाय. साधी गोष्ट सांगतो, गेल्या तीन दिवसांपासून ऐकतोय, १५०-२०० जीआर एक दोन दिवसांत काढलेत. पुणे जिल्ह्याच्या डीपीडीसीचा १७० कोटी रूपयांचा फंड एकतर्फी शिरूरच्या खासदारांना १५ कोटी, बारामतीच्या खासदाराला १८ कोटी, जुन्नरच्या आमदारांना १० कोटी, खेडच्या आमदारांना १२ कोटी अशा १७८ कोटींचे प्रस्ताव मंजूर करून सहीला गेलेत. जिल्हा परिषदेचे सदस्य नाही, मंत्री नाहीत, कोणाला काही विचारलं नाही, कोणाचं काही अपील नाही. हे काय सुरू आहे? किती आम्ही सहन करायचं याचा विचार व्हायला पाहिजे या मताचा मी आहे,” असं आढळराव पाटील म्हणाले. पुण्यातील चाकण येथे बोलताना त्यांनी यावर वक्तव्य केलं.
“कोणत्याही परिस्थिती शिवसेना एकत्र राहिली पाहिजे. आजही आपल्या पक्षावर संकट आलंय. सर्वांचीच जबाबदारी आहे, पण मी पुढे राहणार. पण बोटचेपी धोरण करता कामा नये. कशासाठी लोक तुमच्याकढे येतील, का उभे राहतील?,” असा सवालही त्यांनी यावेळी केला.