Kasba By Elelction: कसब्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची राज्य यंत्रणा लागली कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 01:16 PM2023-02-21T13:16:55+5:302023-02-21T13:17:19+5:30
आपापल्या संपर्कातील, नात्यातील तसेच ओळखीचे मतदार शोधून त्यांच्यापर्यंत पोहचावे; कार्यकारिणीचा आदेश
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने संपूर्ण राज्यातील यंत्रणा कामाला लावली आहे. मतदारांशी संपर्क मोहिमेसाठी भाजपच्या नेत्यांनी राज्यभरातील जिल्हा आणि मंडळ कार्यकारणीच्या नावाने आदेश काढला असून, आपापल्या संपर्कातील, नात्यातील तसेच ओळखीचे मतदार शोधून त्यांच्यापर्यंत पोहचावे. याप्रकारे प्रत्येक जिल्ह्यातून किमान १०० अर्ज भरून दिले जावेत, असा आदेश दिला आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्यभरातील यंत्रणा या मतदारसंघासाठी कामाला लावण्याची रणनीती भाजपने आखली आहे.
पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघात येत्या २६ तारखेला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत भाजपपुढे महाविकास आघाडीने आव्हान उभे केले आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे समर्थकही गेल्या काही दिवसांपासून आक्रमक होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुका भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यातील त्यांच्या पक्षातील संपूर्ण यंत्रणा कसब्यात कामाला लावली असून, ते स्वत:ही येथील प्रचारात उतरले आहेत.
भाजपने प्रदेश पातळीवरून संपूर्ण राज्यभरातील जिल्हा आणि मंडळ कार्यकारिणीला कसबा तसेच चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदार शोधमोहिमेसाठी कामाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. वरवर पाहता दोन्ही पोटनिवडणुकांसाठी ही रचना उभी केली जात असली तरी संघ, ब्राह्मण समाजातील मतदार तसेच विशिष्ठ संस्था, ठराविक मंडळांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमधून विशेषत: कसब्यासाठी रसद उभी राहावी अशा पद्धतीने ही व्यूहरचना आखली जात आहे.