आमच्या लेकरा-बाळांचं रक्त सांडलं, पण ते सगळं टेंटवाल्यांनी नासवलंय; पवना धरणाकाठाचा संताप
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: November 22, 2023 12:22 PM2023-11-22T12:22:59+5:302023-11-22T12:23:37+5:30
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पवना धरण परिसरात केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये धरणाचा काठ अनधिकृत टेंट व्यावसायिकांनी बळकावल्याचे आणि तेथे राजरोस अनधिकृत धंदे सुरू असल्याचे उघड झाले....
पिंपरी : ‘पवनेच्या पाण्याच्या संघर्षात आमच्या लेकरां-बाळांचं रक्त सांडलंय. हे पाणी आमच्यासाठी अमृत हाय; पण हे टेंटवाले बाया-पोरी नाचवत्यात, दारू देत्यात. पाणी नासवत्यात. पोलीस हप्ते घेऊन गप्प बसत्यात. हे धरणवालेबी त्यांना पाहिजे तेव्हा पाणी सोडत्यात...’, काळे कॉलनीतील आजोबा संतापानं व्यथा मांडत होते. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पवना धरण परिसरात केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये धरणाचा काठ अनधिकृत टेंट व्यावसायिकांनी बळकावल्याचे आणि तेथे राजरोस अनधिकृत धंदे सुरू असल्याचे उघड झाले.
मावळ तालुक्यातील पवना धरणाकाठी चार वर्षांपासून अनधिकृत टेंट हाऊसचा ‘कॅम्प’ व्यवसाय जोमात आहे. त्यांच्यावर ना पोलिसांचा, ना प्रशासनाचा अंकुश. पवनाकाठच्या जागेवर कब्जा करायचा, तेथे टेंट उभारायचा आणि कृषी पर्यटनाच्या नावाखाली तुंबड्या भरण्याचा खेळ सर्रास सुरू आहे. रिकाम्या जागेला आता ‘अर्थ’ आला असून, या परिसरात पहाटे चार-पाच वाजेपर्यंत दारू-बीअरवर झिंगणारी तरुणाई डीजे आणि डॉल्बीच्या तालावर थिरकत आहे. सिगारेट-हुक्क्याच्या धुरात डुंबत आहे. अमृतासारख्या पाण्यात सांडपाणी सोडून पवना नासवली जात आहे. वयात येणाऱ्या इथल्या मुलांची पिढीही बरबाद होत आहे.
पाचशे ते तीन हजारांपर्यंत टेंटचे भाडे
धरणाच्या परिसरात दोनशेवर टेंटची गर्दी दिसते. अगदी पाण्याच्या काठांवर टेंट उभारण्यात आले आहेत. साधे कापडी-प्लास्टिकचे तंबू आणि कॉटेज यांचे ‘कॅम्प’ दिसतात. यासाठी काही कंपन्या ऑनलाइन पद्धतीने बुकिंग घेतात. त्यावर पाचशे रुपये ते तीन हजारांपर्यंत भाडे दाखविले जाते. मात्र, जो टेंटवाला जास्त कमिशन देईल, त्याच्याकडे ग्राहक पाठवले जातात. एकदा पर्यटक तेथे पोहोचला की त्याला ‘नडलेला ग्राहक’ बनवले जाते. मग ‘विकेंड’ला टेंटचे दर माणसी पाचशेवरून तीन हजारांवर जातात.
प्रेमीयुगुलांचा मुक्त वावर
ऑनलाइन बुकिंग झाल्यानंतर सगळा खेळ व्हाॅटस्ॲपवर सुरू होतो. ऑनलाइन बुकिंग झाल्यावर वेबसाइटवरील एजंट लोकेशन आणि तेथील टेंटवाल्याचे नाव सांगतो. तेथे पोहोचल्यावर बुकिंग ज्याच्या नावे झाले आहे, त्याच्या नावाची खात्री केली जाते, मात्र ना नोंद केली जाते, ना ओळखपत्र तपासले जाते. वयाचा पुरावा मागितलाच जात नसल्याने अल्पवयीन प्रेमी युगुलांचा मुक्त वावर दिसून येतो. प्रेमी युगुलांसाठी ‘निरोध’चीही खास सोय असल्याचे ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला सांगण्यात आले !
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने काय पाहिले? हे घ्या पुरावे...
१) ऑनलाइन बुकिंग केेलेल्या ग्राहकांचे फक्त नाव आणि मोबाइल नंबर विचारून खात्री केली जाते. ओळखपत्र, वयाचा पुरावा घेतला जात नाही. रजिस्टरमध्ये नोंदही नाही.
२) अल्पवयीन मुला-मुलींना मुक्कामासाठी मुक्त प्रवेश
३) कोणत्याही वेळी बिअर आणि दारूचा पुरवठा
४) सरकारी जागेत पार्किंगच्या नावाखाली लूट
५) मैलामिश्रित सांडपाणी पवना धरणातच
६) अवैध पाणी उपसा आणि अनधिकृत वीजजोडण्या
‘लोकमत’चे प्रश्न, द्या उत्तरे...
१) शासनाच्या ताब्यातील जागेवर चाललेला कॅम्प व्यवसाय अनधिकृत नव्हे काय?
२) टेन्टच्या कॅम्प व्यवसायाला परवानगी कोणाची?
३) राजरोज व्यवसाय सुरू असताना शासकीय यंत्रणा गप्प का?
४) दारू, हुक्का यांचा राजरोस पुरवठा सुरू असताना पोलिस आणि अबकारी विभागाचे अधिकारी करतात काय?
५) अनधिकृत वीजजोडण्या घेतल्या तरी महावितरण अंधारात कसे?
६) मैलायुक्त सांडपाणी धरणात सोडले जात असताना आणि ध्वनिप्रदूषण सुरू असताना प्रदूषण नियंत्रण मंडळास दिसत नाही का?