Raksha Bandhan 2024: बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! मुक्ताईने पाठवली बंधू माऊलींना राखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:36 PM2024-08-19T13:36:08+5:302024-08-19T13:36:41+5:30
मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवला
भानुदास पऱ्हाड
आळंदी : रक्षाबंधन म्हणजे बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग म्हणून ओळखला जातो. यापार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईबाई संस्थांनच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व सोपानदेव या तिन्ही देवरुपी संत भावंडांना रक्षाबंधन निमित्त राखी अर्पण करण्यात येते. यंदाही आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर येथून बंधू माऊलींना राखी आली आहे.
बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! मुक्ताईने पाठवली बंधू माऊलींना राखी#Pune#alandi#rakshabandhan2024pic.twitter.com/clDZD8Mule
— Lokmat (@lokmat) August 19, 2024
तीर्थक्षेत्र आळंदीत सोमवारी (दि.१९) पहाटे माऊलींच्या संजीवन समाधीला पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली. त्यानंतर माऊलींच्या समाधीवर आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानाचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या हस्ते राखी अर्पण करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं तर्फे आदिशक्ती मुक्ताबाईला साडी चोळी भेट म्हणून देण्यात आली. दरम्यान दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवला. दिवसभरात पंचवीस हजारांहून अधिक भाविकांनी समाधीचे दर्शन घेतल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली. रक्षाबंधन निमित्त वाघोलीतील गाडे कुटुंबायांकडून संत ज्ञानेश्वर महाराजांस दोन तोळ्याची सुवर्ण राखी अर्पण करण्यात आली. वाघोलीतील गाडे कुटूंबियांचे माऊलीस सुवर्ण राखी अर्पण करण्याचे हे तिसरे वर्ष आहे.