आराेग्य विभागाचीच हाडे खिळखिळी; पुणे महापालिकेच्या दवाखान्यात डायलिसिसची औषधे मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 01:55 PM2022-12-15T13:55:06+5:302022-12-15T13:59:24+5:30
शहरातील महापालिकेच्या दवाखान्यात रुग्णांना हवी ती औषधी मिळत नसल्याचे चित्र ‘लाेकमत’च्या पाहणीतून समाेर आले
ज्ञानेश्वर भाेंडे/अजित घस्ते
पुणे : शहरातील महापालिकेच्या दवाखान्यात रुग्णांना हवी ती औषधी मिळत नसल्याचे चित्र ‘लाेकमत’च्या पाहणीतून समाेर आले आहे. यात प्रामुख्याने डायलिसिससाठी लागणारे वैद्यकीय साहित्य शहरी गरीब रुग्णाला दाेन ते तीन महिन्यांपासून मिळतच नाही, तसेच विनंती करूनही खाेकल्यावर गुणकारी असणारे लाल रंगाचे कफ सिरप मिळतच नाही, असे रुग्णांचे म्हणणे आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी काही दिवसांपूर्वीच उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची पोलखोल केली. त्या तेथील रुग्णालयात गेल्या असता शासकीय रुग्णालयात कॅल्शियमची गाेळीच उपलब्ध नसल्याचे आढळले. ही औषधी खासगी रुग्णालयातून खरेदी करण्यास सांगितले गेले. आराेग्य मंत्र्यांच्याच जिल्ह्यात आलेला हा अनुभव. तीच परिस्थिती पुण्यातील महापालिकेच्या दवाखान्यात पाहायला मिळाली. लाेकमत प्रतिनिधींनी काही दवाखान्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या असता ही बाब निदर्शनास आली आहे.
कुठे आणि काय आढळले
१) महापालिकेच्या वडगाव येथील दवाखान्यात जाऊन पाहिले असता तेथे सकाळी अकराच्या सुमारास रुग्ण जेमतेम हाेते. दहा रुपयांचा केसपेपर काढल्यानंतर काय त्रास हाेताे असे विचारले गेले. ताप आणि खाेकला असल्याचे सांगितले असता आतमध्ये पाठवण्यात आले. तेथे महिला वैद्यकीय अधिकारी हाेत्या. त्यांनीही काय त्रास हाेत आहे हाच प्रश्न विचारला आणि गाेळ्या लिहून दिल्या. त्यांनी ताप, सर्दी खाेकल्यासाठी पॅरॅसिटेमॉल, अँटिबायाेटिक आणि खाेकल्याच्या गाेळ्यांचा तीन दिवसांचा काेर्स करायला सांगितले. खाेकल्याची औषधी मागितली असता ते दिले नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन खाेकल्याचे सिरप देण्याची विनंती केली, मात्र त्यांनीही आधी या गाेळ्या खा, त्यावर खाेकला राहिला नाही, तर पुन्हा या; मग औषधी देऊ, असे सांगितले. मात्र, हे औषध गुणकारी असून, ते देण्यात यावे, अशी विनंती पुन्हा केली असतानाही ते देण्यात आले नाही.
२) पद्मावती येथील शिवशंकर पाेटे दवाखान्यात जाऊन पाहणी केली असता तेथेदेखील अशाच प्रकारचा अनुभव आला. कफ सिरप मिळत नव्हते.
३) मित्रमंडळ चाैकातील महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बाह्यरुग्ण दवाखान्यातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली.
''मी गेल्या तीन महिन्यांपासून वडगाव येथील दवाखान्यात डायलिसिसच्या औषधांसाठी तसेच लागणाऱ्या साहित्यासाठी चकरा मारत आहे. त्यासाठी लागणारे ट्यूब, कॅथेटर व इंजेक्शन हे मिळत नाहीत. आजही फाइल घेऊन आलाे असता, त्यासाठीचे औषधी वरूनच आलेली नाहीत, असे सांगण्यात आले. - एक रुग्ण, वडगाव (बु.)''
''खाेकल्यासाठी लागणारे कफ सिरफ सर्व दवाखान्यांत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. काही दवाखान्यांनी ते आणलेले नसल्याने मिळू शकत नसेल. डायलिसिससाठी लागणारे साहित्य हे शहरी गरीब याेजनेतील लाभार्थी रुग्णांना देण्यात येते. ज्यांची संख्या शहरात दाेन हजार आहे. बजेट नसल्याने त्याची खरेदी झाली नव्हती. आता निधीचे वर्गीकरण करून टेंडर प्रक्रिया पार पडली असून, हे साहित्य पुढील आठवड्यात उपलब्ध हाेईल. त्याचबराेबर ज्या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह आहे, त्यांना जेनेरिक औषधी शहरी गरीब याेजनेद्वारे देण्यात येतात. जे याेजनेत नाहीत, ज्या रुग्णांकडे काेणतेही कार्ड नाही, त्यांनाही देण्यात येतात. - डाॅ. संजीव वावरे, सहायक आराेग्य अधिकारी, पुणे मनपा.''