पुल पाडला, JCB ची लाईन लागली; चांदणी चौकात राडारोडा उचलण्याचे काम अजूनही सुरुच
By विवेक भुसे | Published: October 2, 2022 09:11 AM2022-10-02T09:11:19+5:302022-10-02T09:12:55+5:30
१० वाजल्यानंतर चांदणी चौकातील वाहतूक सुरु होण्याची शक्यता
पुणे : मुंबई -बंगलोर महामार्गावरील पुण्यातील चांदणी चौकातील पुल मध्यरात्री कंट्रोल ब्लास्टद्वारे पाडण्यात आला. पुल पाडल्यानंतर तेथील राडारोडा उचलण्याचे काम जोरात सुरु आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत वाहतूक सुरु करता येईल, असे नियोजन होते. मात्र, पुल अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत असल्याने पुल पाडण्यास उशीर झाला. त्यामुळे अजूनही राडारोडा उचलण्याचे काम सुरु असून आणखी किमान एक तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी १० वाजल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे.
मध्यरात्री एक वाजता स्फोट घडवून हा पुल पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, पुलासाठी वापरलेल्या स्टीलचे प्रमाण अधिक असल्याचे स्फोटात पुल फक्त खिळखिळा झाला. याबाबत एडिफिस कंपनीचे अधिकारी आनंद शर्मा यांनी सांगितले की, चांदणी चौकातील स्फोट यशस्वी झाला. मात्र, पुलाचे बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात स्टिल व दगड वापरण्यात आले होते. त्यामुळे पुल कमकुवत झाला़ तरी पिलर पडले नाही. एन डीएच्या बाजूचे काही होल मिस झाल्याची शंका आहे. नोएडा येथील टिष्ट्वन्स टॉवर पाडण्यासाठी एक्सप्लोजन करण्यात आले होते. हे ब्लास्टिंग आहे़.
पुलाचा हा राडारोडा बाजूला करण्यासाठी ३० टिप्पर, २ ड्रिलिंग मशीन, १६ एक्स्कॅव्हेअर, ४ डोझर, ४ जे सी बी यांच्या सहाय्याने संपूर्ण रात्रभर हा राडारोडा काढण्याचे काम सुरु आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत जवळपास सर्व राडारोडा काढण्यात यश आले आहे. आता या ठिकाणची सर्व साफसफाई करण्यात येत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत हा संपूर्ण राडारोडा उचलला जाईल व त्यानंतरच वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.