World Health Day: इंग्रजांनीही गांधींचे प्राण इथे वाचवले! पुण्यातील ससून म्हणजे माणुसकीचे गाव
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: April 7, 2023 03:48 PM2023-04-07T15:48:05+5:302023-04-07T15:48:53+5:30
ऑपरेशन सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्यावर चक्क दिव्याच्या प्रकाशात शस्त्रक्रिया यशस्वी झाली
पुणे: ससून हाॅस्पिटलने काय पाहिले नसेल? साक्षात महात्मा गांधींवर येथे शस्त्रक्रिया झाली. ही ऐतिहासिक इमारत अनेक घटनांची साक्षीदार आहे. महात्मा गांधी तुरुंगात असताना आजारी पडले. ‘अपेंडायटिस’मुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार, हे नक्की झाले. त्यासाठी त्यांना ससूनमध्ये दाखलही केले. मात्र, शस्त्रक्रिया काेण करणार, हा प्रश्न हाेता. ही शस्त्रक्रिया भारतीय डाॅक्टरने करावी, अशी इंग्रज सरकारची इच्छा हाेती. कारण, शस्त्रक्रियेदरम्यान जर काही वावगे घडले तर अवघ्या देशात संतापाची लाट उसळली असती. पण वेळच अशी आली की गांधींवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्यायच नव्हता.
शंभर वर्षांपूर्वीचा ताे काळच वेगळा हाेता. स्वातंत्र्य चळवळ अगदी बहरात हाेती. १९२२ मध्ये महात्मा गांधींना अटक झाली आणि त्यांना येरवडा तुरुंगात टाकले गेले. ते आजारी पडल्याने ससूनमध्ये दाखल केले. १२ जानेवारी १९२४ राेजी ब्रिटिश सर्जन कर्नल मॅडाॅक यांनी शस्त्रक्रिया करण्याचे मध्यरात्री निश्चित केले.
‘यादरम्यान, काही वावगे घडले तर त्यास डाॅक्टर जबाबदार नसून मी जबाबदार आहे’, अशा आशयाचे पत्र गांधींकडून लिहून घेतले गेले. त्या पत्रावर सही केल्यावर गांधी डाॅक्टरांकडे पाहत मिश्कीलपणे म्हणाले, ‘बघा डाॅक्टर, माझा हात थरथर कापताेय. तुम्हाला ताे नाॅर्मल करायचा आहे!’ त्यावर डाॅ. मॅडाॅक म्हणाले, ’मी माझे सगळे ज्ञान व शक्ती पणाला लावेल; पण तुम्हाला वाचवेन’. मग गांधींना भूल दिली गेली. ऑपरेशन सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाला. तेव्हा चक्क दिव्याच्या प्रकाशात शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
गांधी बरे झाले. त्यांनी इंग्रजांचे आभार मानले. विश्रांती घेण्यासाठी इंग्रज सरकारने गांधींना ५ फेब्रुवारी १९२४ राेजी तुरुंगातूनही मुक्त केले. कट्टर विराेधकही येथे एकमेकांचे प्राण वाचवतात आणि मन जाणतात, असे हे ससून हाॅस्पिटल. येथे माणुसकी दिसते. माणसांना वाचवणारी माणसं दिसतात. आज जागतिक आराेग्य दिन साजरा हाेत असताना ही गाेष्ट पुणेकरांना पुन्हा पुन्हा आठवत राहते.
ससून हे १४४ बेडपासून सूरू झालेला हा प्रवास आज दाेन हजार बेडपेक्षा जास्त
आराेग्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याची काळजी घेणा-ससून हाॅस्पिटल व नायडू हाॅस्पिटल या दाेन सरकारी संस्था शतकाेत्तर काळातही आज माेठया दिमाखात उभ्या आहेत. नागरिकांच्या आराेग्याची काळजी घेत आहेत. आज या दाेन्ही हाॅस्पिटलचा माेठा विस्तारही झालेला आहे आणि अत्याधुनिक आराेग्यसुविधांनी युक्त आहेत. मात्र, सुरवातीच्या काळात अतिशय छाेटया जागेत, कमी संसाधने, मणुष्यबळात सूरू झालेल्या या संस्थांचा आता वटवृक्ष झाला आहे. जागतिक आराेग्य दिनानिमित्त त्यांचा घेतलेला हा आढावा. त्यापैकी ससून हे १४४ बेडपासून सूरू झालेला हा प्रवास आज दाेन हजार बेडपेक्षा जास्त झाली आहे.
किडनी, यकृत प्रत्याराेपण होतायेत आव्हानात्मक शस्त्रक्रिया
पुण्याचा आराेग्याचा इतिहास हा ससून हाॅस्पिटल पासून सूरू हाेताे. सर्वात पहिले हे सरकारी हाॅस्पिटल हाेय. डेव्हिड ससून ही पहिली इमारत १८६७ मध्ये बांधली. त्यापाठाेपाठ जेकाॅब ससून ही इमारत तयार झाली. त्यानंतर इतर इमारती बांधल्या आणि आता येथे अकरा मजली सुपरस्पेशालिटी इमारतही रुग्णसेवेसाठी सज्ज आहे. तसेच येथे २८ प्रकारचे विभाग असून त्याद्वारे सर्वच प्रकारचे उपचार हाेतात आणि अगदी किडनी, यकृत प्रत्याराेपण असे आव्हानात्मक शस्त्रक्रियाही हाेत आहेत.
या नामांकित व्यक्तींनी घेतले उपचार
20 व्या शतकातील सुप्रसिद्ध इराणी मेहेर बाबा यांचा जन्म ससून रुग्णालयात १८९४ साली झाला. मुस्लिम संतांपैकी हजरत बाबाजान यांच्यावर 1931 रोजी येथे उपचार झाले. तर १९२४ राेजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर ॲपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तर, 50 च्या दशकातली सुंदर अभिनेत्री मीना कुमारीवरही उपचार करण्यात आले. अशा प्रकारे लाखाे ते काेटयावधी रुग्णांवर उपचार येथे करण्यात येतात.
अवघ्या २.१३ लाखांत उभी राहिली इमारत
ज्यू धर्मीय व पराेपकारी वृत्तीचे डेव्हिड ससून हे बगदादहून भारतात आले. त्यांनी अफूचा व्यापार भारतात केला. त्यांनी दिलेल्या २ लाख १३ हजार रूपयांच्या सढळ देणगीतून गाेरगरीबांच्या रुग्णसेवेसाठी पुण्यात १८६७ मध्ये घडयाळाचे टाॅवर असलेली ससून हॉस्पिटलची पहिली मजबुत दुमजली दगडी इमारत उभी राहिली. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली ही इमारत कॅप्टन एच सेंट क्लेर यांनी ही इमारत डिझाईन केली तर विल्किन्स राॅयल इंजिनिअर यांनी त्याचे बांधकाम पूर्ण केले. ही माहीती इमारतीच्या आतील बाजुस एका शिलालेखात इंग्रजी, मराठी व हिब्रु भाषेत लिखित स्वरूपात आजही उपलब्ध आहे.
‘बीजे’चे बीज रूजले १८७१ मध्ये
पारसी उद्योजक बैरामजी जीजीभाॅय हे मुंबईहून पुण्याला आले व त्यांनी ससून रुग्णालयाच्या शेजारी १८७१ साली एक छोटे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र उभ केलं. त्यालाच त्यांच नाव देण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राच पुढे १९४६ राेजी रुपांतर बीजे मेडिकल काॅलेजमध्ये झाले. नंतर पुढे एमबीबीएस काेर्सेस सूरू झाले. पुढे याच हाॅस्पिटलने प्लेग, २००९ मध्ये स्वाईन फलू आणि २०२० मध्ये काेराेनासारखी जागतिक महामारी हाताळण्यात माेलाची भुमिका बजावली.
साथराेगाचे ‘नायडू’ हाॅस्पिटल
मुंबईत आलेली प्लेगची साथ डिसेंबर १८९६ ला पुण्यात दाखल झाली आणि तिने हाहाकार उडविला. या साथीने अवघ्या चार वर्षांमध्ये १७ हजारांहून अधिक पुणेकरांचा बळी घेतला. एखादयाला प्लेग झाला की त्याला गावाबाहेर घेउन जात असत. अशा रुग्णांसाठी त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पुणे नगरपालिका, पुणे उपनगरपालिका आणि पुणे कॅंटोन्मेंट या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांनी नदीच्या संगमाजवळ सन १९०० मध्ये प्लेगसाठी हाॅस्पिटल सुरू केले. प्लेग आटोक्यात आणण्यासाठी नेमलेल्या प्लेगप्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. नायडू यांचे नाव त्या हाॅस्पिटलला दिले.
आता या ठिकाणी २५० हून अधिक बेड असून येथे संसर्गराेगाचे क्षयराेग, स्वाइन फलू हे रुग्ण ठेवण्यात येत आहेत. काेराेनाच्या काळातही पहिला रुग्ण येथेच दाखल केला हाेता. आता या हाॅस्पिटलच्या आवारात महापालिकेचे वैदयकीय महाविदयालय बांधण्यात येत आहे. परंतू, एका शतकाहून अधिक काळ या हाॅस्पिटलने पुणेकरांचे आराेग्य आबादित राखले आहे.