गणेश खिंड रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी इमारत केली जमीनदोस्त
By राजू हिंगे | Published: March 27, 2024 08:08 AM2024-03-27T08:08:05+5:302024-03-27T08:08:52+5:30
सुमारे साडेसहा गुंठ्यापेक्षा अधिक क्षेत्र महापालिकेचे ताब्यात आलेले आहे....
पुणे : गणेशखिंड आणि सेनापती बापट रोड यांच्या जंक्शनवर असणारी एम एस ई डी सी एल ची इमारत पुणे महापालिकेने जमीन दोस्त केली. त्यामुळे साडेसहा गुंठे जागा ताब्यात आली असून रस्ता रुंदीकरण तातडीने करता येणार आहे. यामुळे या रस्त्यावरील गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे
गणेशखिंड रोड पूर्ण ४५ मीटर करण्याच्या अनुषंगाने रस्त्यावरील विविध मिळकतींचा ताबा घेणे व रुंदीकरण करणे ही कामे पुणे महापालिके मार्फत प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. वाहतुकीची होणारी कोंडी लवकरात लवकर दूर करण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज म.रा.वि मंडळाची गणेश खिंड रस्ता आणि सेनापती बापट रोड यांचे जंक्शनवर असणारी इमारत ताब्यात घेण्यात आली. मध्यरात्री ही इमारत जॉ-कटरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.
सुमारे साडेसहा गुंठ्यापेक्षा अधिक क्षेत्र महापालिकेचे ताब्यात आलेले आहे. इमारत पाडल्यामुळे तेथील रस्ता रुंदीकरण आता तातडीने करता येणे शक्य होणार आहे. ही कारवाई पथ विभाग मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता अमर शिंदे, कार्यकारी अभियंता दिलीप पावरा, उप अभियंता मनोज गाठे आणि कनिष्ठ अभियंता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.