सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार, सुट्टीच्या दिवशी उमेदवारांचा जोरदार प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 06:00 PM2024-11-17T18:00:58+5:302024-11-17T18:02:28+5:30
विधानसभा निवडणुकीने वातावरण निघाले ढवळून : मागील २० दिवस झाडल्या गेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची मुदत सोमवारी सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. त्यामुळे रविवारचा मुहूर्त साधून शहरातील सर्वच उमेदवारांनी रविवारी (दि. १७) जोरदार प्रचार केला. ढोल-ताशांचा गजर, समर्थकांसह काढलेल्या रॅली, पदयात्रा, प्रचारफेऱ्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पत्रके वाटप आणि मतदारांशी थेट संपर्क करत आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न केला. शहरात प्रचाराची राळ उडाली अन् आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राजकीय कलगीतुराही जाेरदार रंगला होता.
विधानसभा निवडणूक १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. या निवडणुकीसाठी २२ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी हाेता. मतदान बुधवारी (दि. २०) होणार असल्याने, प्रचाराचा शेवट सोमवारी सायंकाळी हाेणार आहे. मागील २० दिवसांत प्रचारसभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच रविवार सुटीचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पायांना भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढला. दारोदारी जाऊन नागरिकांची भेट घेत मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांपर्यंत स्वतःचे नाव, निवडणूक चिन्ह पोहोचवले. यामुळे रविवारी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले हाेते.
दिग्गजांनी लावली हजेरी
कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्यात दुहेरी लढत आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह अन्य नेतेमंडळींनी हजेरी लावत, याच उमेदवाराला मतदान करा असे आवाहन केले. महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले, सी. टी. रवी यांनी हजेरी लावत विविध भागांत रॅली आणि सभेत सहभाग नोंदवला. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे शरद पवार, काँग्रेसचे नेते इम्रान प्रताप गढी, बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, राजेश लीलोठिया, खासदार संजय राऊत, वंदना चव्हाण, के. जे. जॉर्ज यांनी हजेरी लावली.
प्रचारासाठी स्टार मैदानात
हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप, महायुतीचे चेतन तुपे, मनसेचे साईनाथ बाबर आणि अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोड शो झाला. हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचाही मेळावा झाला. अभिनेते भाऊ कदम हेदेखील प्रचारात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांची जाहीर सभा झाली. मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचारात माजी आमदार महादेव बाबर सक्रियपणे सहभागी झाले होते.