Supriya Sule: केंद्रातले सत्ताधारी व राज्यातले विरोधक महागाईपासून लपतायेत; सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 06:32 PM2022-03-27T18:32:36+5:302022-03-27T18:33:08+5:30

आरोप - प्रत्यारोपांच्या माध्यमातून देशातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे

The central government and the opposition in the state are hiding from inflation Criticism of Supriya Sule | Supriya Sule: केंद्रातले सत्ताधारी व राज्यातले विरोधक महागाईपासून लपतायेत; सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule: केंद्रातले सत्ताधारी व राज्यातले विरोधक महागाईपासून लपतायेत; सुप्रिया सुळेंची टीका

googlenewsNext

बारामती : आरोप - प्रत्यारोपांच्या माध्यमातून देशातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या गदारोळामध्ये राज्यातील विरोधी पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी महागाई पासून लपत आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामती येथे गोविंद बाग या निवासस्थानी रविवारी (दि. 27) त्या माध्यमांशी बोलत होत्या. 

सुळे म्हणाल्या, महागाईचे सर्वात मोठे आव्हान सध्या आपल्यासमोर आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी तिकडे गेलेली मुले पुन्हा भारतात परतली आहेत. त्यांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार का? त्यांच्या शिक्षणाचे पुढे काय होणार? असे अनेक गंभीर प्रश्न आपल्या समोर आहेत. आता पेन ड्राईव्हचे फॅड आले आहे. या माध्यमातून मात्र काहीतरी थातूरमातूर आरोप करायचे, हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला न शोभणारे आहे. महागाईच्या संकटातून जनतेला कसा दिलासा दिला जाईल याबाबत काम करणे जास्त महत्त्वाचे आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. 

सुडाचे राजकारण या देशात कधीही नव्हते मात्र... 

कोणीही आयुष्यभर सत्तेत नसतं. सत्तेच्या माध्यमातून आपल्या विरोधकाला त्रास होईल असे निर्णय कोणीही घेऊ नये. केंद्रीय तपास यंत्रणांचा ज्या पद्धतीने गैरवापर होतो आहे. याबाबत मी गृहमंत्री अमित शहा व अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली. याबाबत निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये माझ्या प्रश्नाला उत्तर देखील दिले. सुडाचे राजकारण या देशात कधीही नव्हते. मात्र दुर्दैवाने असे चित्र अलीकडे दिसू लागले आहे. सध्या कोविड मधून आपण बाहेर पडत आहोत. महागाई बेरोजगारी असे अनेक मोठे प्रश्न आपल्यासमोर आहेत. देश कसा पुढे जाईल हे पाहणे खूप गरजेचे आहे. राजकारण काय होतच राहिल. निवडणुका आल्यानंतर ते पाहू, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

बारामती मध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना कशा पद्धतीने राबवल्या जातात. तसेच या भागात ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जे बारामती मॉडेल विकसित झाले आहे, याचा अभ्यास करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी बारामती चा अभ्यास दौरा केला आहे. बारामती मध्ये शेती, शिक्षण, इंक्युबॅशन सेंटरच्या माध्यमातून होणारे काम, एमायडिसी टेक्स्टाईल पार्क आदी ठिकाणी सुरू असणारे काम हे सर्व या बारा खासदारांनी पाहिले. आपल्या राज्यातील काही कामे व त्यांच्या राज्यातील काही कामे परस्पर सहकार्याने यामध्ये सुधारणा करता येऊ शकतील का? याबाबत केंद्राच्या माध्यमातून काही वेगळ्या योजना आणता येतील का या विषयांवर विचारांची देवाणघेवाण या माध्यमातून होत आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे मागील दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या 12 खासदारांच्या दौऱ्याबाबत दिली.

Web Title: The central government and the opposition in the state are hiding from inflation Criticism of Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.