केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंद निर्णयाचा फेरविचार करावा - विरधवल जगदाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:59 AM2023-12-12T10:59:17+5:302023-12-12T10:59:32+5:30
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची दाट शक्यता
राहू: केंद्र सरकारने नूकताच साखर कारखान्यांनी इथेनॉल ( आसवानी) निर्मिती बाबत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत फेरविचार होणे अतिशय गरजेचे असल्याचे दौंड शुगर साखर कारखान्याचे संचालक विरधवल जगदाळे यांनी सांगितले.
राहू (ता.दौंड) येथे शेतकी गट ऑफिसला भेट दिल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंद निर्णयावर प्रतिक्रिया दिली. दौंड शुगर साखर कारखान्याची सध्याची गाळप क्षमता १७५०० मे टन प्रति दिन असुन आज पर्यंत कारखान्याने ५ लाख १० हजार मेट्रिक टन गाळप केलेले आहे. कारखान्याने केंद्र सरकारच्या धोरणानुसार नुकताच इथेनॉल (आसवानी) २५० के एल बी डी चा प्रकल्प १६० कोटी रुपये खर्च करून कार्यान्वित झालेला आहे. या निर्णयामुळे हा नवीन प्रकल्प ज्यूस (रस) ते इथेनॉल बंद करण्याची वेळ आली आहे.
एका बाजूने केंद्र सरकार इथेनॉल निर्मिती करिता प्रोत्साहन देते आणि दुसऱ्या बाजूने देशांतर्गत वापरासाठी मोठ्या प्रमाणावर साखर निर्मिती करा अशा प्रकारचा आदेश देत आहेत. साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन सुरू केलेल्या या प्रकल्पांचे भवितव्य अधांतरीत झालेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या उपपदार्थ निर्मितीमुळे एफ आर पी पेक्षा अधिकचा बाजार भाव साखर कारखान्यांना देता आलेला आहे. दौंड शुगरने देखील सन २०२३-२४ च्या गाळप हंगामापोटी २९०० रुपयांची पहिली उचल शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे आगामी काळात शेतकरी बांधवांचे देखील आर्थिक नुकसान होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंदचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे.