राज्यातील सत्ता बदलाने पुणे शहर भाजपला बळकटी

By राजू इनामदार | Published: July 9, 2022 02:26 PM2022-07-09T14:26:26+5:302022-07-09T14:27:48+5:30

राज्यात सत्ताबदल झाल्याने भाजप कार्यकर्ते महापालिकेसाठी पुन्हा जोशात...

The change of power in the state strengthened the city of Pune BJP | राज्यातील सत्ता बदलाने पुणे शहर भाजपला बळकटी

राज्यातील सत्ता बदलाने पुणे शहर भाजपला बळकटी

Next

पुणे : राज्यातील सत्तेचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात जोर चालवला होता. त्यामुळे महापालिकेत सत्ता असूनही भारतीय जनता पक्षाची शहर शाखा बॅकफुटवर आली होती. आता राज्यात सत्ताबदल झाल्याने भाजप कार्यकर्ते महापालिकेसाठी पुन्हा जोशात आले आहेत. सलग दुसऱ्या वेळी स्पष्ट बहुमताने महापालिका ताब्यात घेणारच असे जाहीरपणे बोलले जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांनी जोरदार वातावरण निर्मिती केली होती. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांना मदत झाली. निविदा, एखादी मोठी योजना आदींवर हरकती घेत राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी राज्याकडे तक्रार केली की लगेच पवार यांच्याकडून त्याची दखल घेतली जायची. प्रभाग रचनेच्या संदर्भातही पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बराच हस्तक्षेप केल्याचे शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता असूनही भाजप काहीशी मागे गेली असे चित्र निर्माण झाले होते.

सततचे आरोप, आंदोलने, मोर्चे करून राष्ट्रवादीने भाजपच्या शहर शाखेला बेजार केले होते. त्यातच प्रभाग रचनेत उपनगरांमधील नगरसेवकांची संख्या वाढली. तिथे राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे आता महापालिका ताब्यात घेतलीच अशा जोशात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते वावरत असत. आता त्यांना भाजपचे पदाधिकारी उत्तर देऊ लागले आहेत. विसर्जित महापालिकेत भाजपचे ९८ नगरसेवक असले तरी त्यातील २० पेक्षा जास्त नगरसेेवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांमधून आलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे वाढते वर्चस्व पाहून परत जुन्या घरी जावे की काय अशा विचारात ते होते. त्यांचा विचार राज्यातील सत्तांतरामुळे बदलल्याचे दिसत आहे. जुन्या नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी थांबवल्या असून भाजपच्या नेत्यांकडची थांबवलेली उठबस पुन्हा वाढवली आहे.

सत्ता हातात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना पुन्हा करणार, कारशेड आरेतच करणार अशा घोषणा केल्या. त्याप्रमाणेच आता शहरातील भाजपचे पदाधिकारीही नदी सुधार योजना राबवणारच, प्रभाग रचना बदलून घेणारच असे बोलू लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ज्या योजना थांबवल्या होत्या त्या पुन्हा सुरू हाेण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तेचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत आमच्या अनेक योजनांना खीळ घातली. तसे आता होणार नाही. प्रभाग रचनेतील बदलही त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सांगून करून घेतले हाेते. आम्ही त्याला हरकत घेतलीच आहे; पण आता आमच्या सरकारकडून आम्ही ते बदलवून घेऊ.

- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी

Web Title: The change of power in the state strengthened the city of Pune BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.