‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ

By संतोष आंधळे | Published: May 30, 2024 06:25 AM2024-05-30T06:25:27+5:302024-05-30T06:25:52+5:30

प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीकडून ‘ससून’च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

The changed blood of the Pune Porsche Car Accident Accused is of the woman or the other lady? report submitted by the investigative Committee | ‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ

‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पुण्यातील कल्याणीनगर अपघातप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय चाचणीसाठी आरोपी ‘बाळा’चे बदललेले रक्त एका महिलेचे असल्याचे चौकशी समिती अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु हे ‘बाळा’च्या आईचे असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

अपघातानंतर आरोपी बाळाला १९ मे रोजी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी दुसरेच रक्ताचे नमुने दिले होते. त्यामुळे त्या रक्तचाचणीत कोणताही दोष आढळून आला नव्हता. मात्र, अनेक दिवस जे रक्त पोलिसांना देण्यात आले होते ते कुणाचे होते, हा प्रश्न अनुत्तरित होता. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बुधवारी अहवाल सादर केला. त्यात डॉक्टरांनी  प्रचलित नियमांची अंमलबजावणी केली नसल्याचे म्हटले आहे. तसेच आरोपीला चालता येते की नाही, हे पाहणे गरजेचे असते, परंतु तेही तपासले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

डॉ. काळे सक्तीच्या रजेवर; दोन डॉक्टरांचे निलंबन

ससून रुग्णालयात दोन डॉक्टरांना रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी चौकशी समितीने शासनाकडे अहवाल सादर केल्यानंतर चक्रे वेगाने फिरली. वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश काढले. 

बाळाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटक झालेल्या ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना निलंबित करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी हे आदेश काढले. न्यायवैद्यकशास्त्र विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यालाही निलंबित केले आहे.

‘त्या’ दोन डॉक्टरांची चाचणीही ससूनमध्ये

ज्या दोन डॉक्टरांनी रक्त नमुन्यात फेरबदल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती, त्या डॉक्टरांच्या वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना पुन्हा ससून रुग्णालयातच भल्या पहाटे नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्रवालची बेकायदा बांधकामे बुलडोझरने तोडून टाका : मुख्यमंत्री

सातारा : महाबळेश्वरमध्ये कोणी चुकीच्या पद्धतीने याठिकाणी बेकायदेशीर काम करून निसर्गाची हानी करत असेल तर ते चुकीचेच आहे. असे बेकायदेशीर बांधकाम मग तो विशाल अग्रवाल असो अगर कोणीही, त्याचे बांधकाम बुलडोझर लावून तत्काळ तोडून टाका, अशा सूचना मी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

‘त्या’वेळी ससूनमध्ये उपस्थित चौघे काेण?

अपघातानंतर बाळाच्या रक्ताचे नमुने देण्याच्या बहाण्याने तीन व्यक्ती ससून रुग्णालयात उपस्थित होत्या. विशाल अग्रवाल याने एकाला शिपाई घटकांबळे याची भेट घेण्यासाठी पाठवले होते. या चौघांचा गुन्ह्यातील सहभाग पाहता ते आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. गुन्हे शाखेकडून युद्धपातळीवर त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तावरेच्या ऑफिसचा पंचनामा पूर्ण...

डॉ. तावरे याला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील डॉ. तावरे याच्या ऑफिसचा पंचनामा पूर्ण केला. त्याला सील देखील केले आहे. तावरे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. 

ससूनमधील प्रकरणाबाबत चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधितावर कारवाई केली गेली. आमदार टिंगरेंनी डॉ. तावरेंच्या केलेल्या शिफारशीबाबत अधिष्ठात्यांनी सांगायला हवे होते.
- हसन मुश्रीफ, मंत्री

या प्रकरणात चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी त्यांचा अहवाल सादर केला आहे. तो आम्ही शासनाकडे योग्य कार्यवाहीसाठी पाठविला आहे.
- राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग

Web Title: The changed blood of the Pune Porsche Car Accident Accused is of the woman or the other lady? report submitted by the investigative Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.