Video: मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून विचारला जाब, पुण्यात नागरिकांच्या रोशाचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 10:30 PM2022-08-26T22:30:33+5:302022-08-26T22:39:24+5:30
मुंबई बेंगलोर महामार्गावरून कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी साताऱ्याच्या दिशेने निघाले होते
नितीश गोवंडे
पुणे : मुंबईहून निघालेला मुख्यमंत्र्यांचा ताफा चांदणी चौकात शुक्रवारी संध्याकाळी अडकला. यावेळी, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करत नागरिकांनी त्यांचा ताफा अडवत जाब विचारला. हा सर्व प्रकार चांदणी चौकात घडला. या प्रकारामुळे या रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना तब्बल दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.
मुंबई बेंगलोर महामार्गावरून कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पोलिसांनी थांबवली होती. यामुळे कामावरून घरी निघालेल्या नागरिकांना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. या वेळी सगळीकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना नागरिकांनी रस्त्यावर उतरत त्यांचा ताफा अडवला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.
पुणे - वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी चांदणी चौकात अडवला मुख्यमंत्र्यांचाच ताफा pic.twitter.com/Uvvftpf11l
— Lokmat (@lokmat) August 26, 2022
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, नॅशनल हायवे प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना फोन करून प्रवाशांची समस्या दूर करण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे उद्या (शनिवार) सकाळी ११ वाजता चांदणी चौकात संबंधित सर्व स्थापनांचे वरिष्ठ अधिकारी येऊन पाहणी करणार आहेत यानंतर प्रवाशांची समस्या कशी सोडवणार याचा अहवाल ही मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे.