थंडीचा कडाका होऊ लागला कमी! दोन दिवसांमध्ये पावसाची शक्यता
By श्रीकिशन काळे | Published: January 4, 2024 04:18 PM2024-01-04T16:18:22+5:302024-01-04T16:18:55+5:30
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये शुक्रवारी (दि.५) आणि शनिवारी (दि.६) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे...
पुणे : शहरातील किमान तापमानात घट झाल्याने शिवाजीनगरमध्ये १५.९ अंंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे थंडीपासून पुणेकरांना जरासा दिलासा मिळत आहे. तरी देखील किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच राज्यात शुक्रवारी व शनिवारी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यामध्ये देखील अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण असून, किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये शुक्रवारी (दि.५) आणि शनिवारी (दि.६) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा मध्य भारतात संयोग होणार आहे. परिणामी मध्य भारत आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदूरबारमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तापमानाचा पारा हा १४ अंशाच्या पुढे गेला असून, थंडीचा कडाका कमी जाणवत आहे. दरम्यान, उत्तरेकडील थंडी मात्र अजूनही तशीच आहे. राजस्थानमध्ये सिकार येथे नीचांकी ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तरप्रदेश येथेही किमान तापमान ६ ते १० च्या दरम्यान आहे. त्यामुळे तेथील थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम आहे. यामुळे केरळ ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. तसेच श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
शहरातील किमान तापमान
हवेली : १४.०
एनडीए : १४.९
लवासा : १५.९
शिवाजीनगर : १५.९
कोरेगाव पार्क : १९.३
मगरपट्टा : २०.३
वडगावशेरी : २०.५