Pune Winter: थंडी वाढली अन् ऊबदार कपड्यांची बाजारपेठ सजली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:45 PM2022-11-04T12:45:14+5:302022-11-04T12:45:24+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊबदार कपड्यांच्या खरेदीत दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ
पुणे : मस्त गुलाबी थंडी... सकाळच्या वेळेस धुक्याची पसरलेली दुलई अशा वातावरणामुळे पुणेकरांनाही हुडहुडी भरण्यास सुरुवात झाली असून, ऊबदार कपड्यांच्या खरेदीसाठी पुणेकरांची पावले आता दुकानाकडे वळू लागली आहेत. आकर्षक स्वेटर, जाकिट, हुडी अशा नावीन्यपूर्ण कपड्यांनी बाजारपेठ सजली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊबदार कपड्यांच्या दरांमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याने पुणेकरांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
गेले काही दिवसांत पुण्यात थंडीचा कडाका वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी किमान तापमानाचा पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. त्यामुळे आता पुणेकरांना थंडीपासूनच्या संरक्षणासाठी ऊबदार कपड्यांची गरज भासू लागली आहे. वेटर, मफलर, कानटोप्या, हातमोजे खरेदी करण्यासाठी बाजारात पुणेकरांची गर्दी दिसून येत आहे. मात्र ऊबदार कपडे खरेदी करतानाही जरा हटके आणि फॅशनेबल लूकचाही विचार केला जात आहे. खास चोखंदळ ग्राहकांसाठी स्वेटरचे हटके प्रकार बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापूर्वी लोकरीपासूनच स्वेटर बनवले जायचे. मात्र आता यात कालपरत्वे बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज बाजारात वुलनचे स्वेटर, वेलवेट स्वेटर आणि हुडी असे अनेक प्रकार बघायला मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी ऊबदार कपड्यांच्या दरांमध्ये वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.