दुचाकीचा धक्का लागल्याने झाले भांडण; दोघांच्या मारहाणीत बिगारी कामगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 08:08 PM2022-05-25T20:08:57+5:302022-05-25T20:09:04+5:30

भांडणात दोघा तरुणांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला

The collision caused by the impact of the two wheeler Bigari worker killed in beating of two in pune | दुचाकीचा धक्का लागल्याने झाले भांडण; दोघांच्या मारहाणीत बिगारी कामगाराचा मृत्यू

दुचाकीचा धक्का लागल्याने झाले भांडण; दोघांच्या मारहाणीत बिगारी कामगाराचा मृत्यू

Next

पुणे : रस्त्याने जाताना पाठीमागून आलेल्या दुचाकीचा धक्का लागला. यावर वाद झाल्याने झालेल्या भांडणात दोघा तरुणांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोघा तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अशोक शंकर राव (वय ३०, रा. भोईराज सोसायटी, राजश्री शाहू शाळेमागे, मुंढवा) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर शंकर राव (वय २०, रा. मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मुंढवा येथील हडपसर मुंढवा रोडवरील साई फर्निचर दुकानासमोर मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता घडली.

अशोक राव हा फिर्यादी यांचा मोठा भाऊ आहे. तो मिळेल तेथे बिगारी काम करतो. अशोक हा काम शोधण्यासाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता घरातून निघाला होता. सायंकाळी घरी येत असताना तो पायी जात साई फर्निचर येथे आला असता, पाठीमागून येणाऱ्या दुचाकीचा त्याला धक्का लागला. तेव्हा अशोक याने त्यांना बडबड केली. त्याचा राग येऊन दुचाकीवरील दोघा तरुणांनी खाली उतरले. त्यांनी अशोक याला बेदम मारहाण केली. त्यात तो रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दुचाकीवरील दोघेही पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई आणि मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेच्या जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर दोघांच्या मारहाणीमुळेच अशोक राव याचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलीस पसार झालेल्या दुचाकीस्वारांचा शोध घेत आहेत.

Web Title: The collision caused by the impact of the two wheeler Bigari worker killed in beating of two in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.