आयोगाला सांगूनच बाहेर पडलो होतो; कोरेगाव भीमा सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण
By नितीन चौधरी | Published: February 12, 2024 06:55 PM2024-02-12T18:55:47+5:302024-02-12T18:56:24+5:30
पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे
पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगल पोलिसांनी घडविली आहे. त्यावेळी जी नावे घेतली आहे, त्यांनीच दंगल घडविली आहे, असा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोरेगाव भीमा आयोगापुढे आंबेडकर यांची उलटतपासणी अंतिम टप्प्यात असताना त्यांनी ही साक्ष दिली. हे प्रकरण भलतीकडे वळविण्याचे काम सुरू आहे. ते माझ्या तोंडून वदवून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याने सुनावणीतून मी बाहेर पडतो, असे आयोगाला सांगून मी बाहेर पडलो, अशा शब्दांत सुनावणी अर्धवट सोडून बाहेर पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंबेडकर म्हणाले, ‘मी लेखी म्हणणे कधीच मांडले नाही. या आयोगाला न्यायालयाचे अधिकार दिले नसल्याने त्या आयोगासमोर उभे राहायचे नाही असे ठरविले होते. मात्र, आयोगाने आपल्याला समन्स काढले आणि नागरीक म्हणून आपल्याला उभे राहावे लागेल म्हणून सुनावणीला आलो.’
दरम्यान, आयोगाच्या सुनावणीतून आंबेडकर बाहेर पडल्याने आयोगाचे सरकारी वकील अड. शिशिर हिरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत वस्तुस्थिती मांडली. हिरे म्हणाले, ‘आंबेडकर यांची सरकार पक्षातर्फे त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. एल्गार परिषदेचे आयोजन आणि त्यापूर्वीच्या गोष्टींचा अंतर्भाव होता. कोरेगाव परिसरात हिंसाचार झाला. त्यानंतर दोन जानेवारीला आंबेडकर यांनी तीन जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यावेळी महाराष्ट्रात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी खासगी, सरकारी मालमत्तेचे नुकसान कोण जबाबदार हा प्रश्न होता. सर्वोच्च न्यायालयाने बंद पुकारणाऱ्याला झालेल्या नुकसानीची जबाबदारी घ्यावी लागते असे निवाडे दिले आहेत. राज्यातील ३४ पोलिस मुख्यालयातील ५७१ पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. पाच कोटीपेक्षा जास्त सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्याबाबत जबाबदारी कोणाची असा प्रश्न आंबेडकर यांना विचारला. त्यावेळी उत्तर न देता त्यांनी या कामकाजातून स्वतःला बाजूला करून घेतले आहे.’
‘मी सरकारी वकील आहे. पोलिसांसह राज्य सरकारने कोरेगाव भीमा तसेच शिक्रापूर परिसरात पुरेशी व्यवस्था केली होती. पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे. त्यांनी कोठेही अपुरी व्यवस्था ठेवली नव्हती. कोट्यवधी रुपयांचे स्थानिकांचे नुकसान झाले तरी दोन्ही समाजाला समोरासमोर येऊ दिले नाही. तसेच पोलिसांनी गोळीबारही केला नव्हता.
विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपपत्र दाखल आहे. गुन्ह्याच्या तपासात काही गोष्टी उलगडल्या आहेत. कोणतीही दंगल अचानक होत नसते. त्यामागे नियोजन असते. वढूला २८ डिसेंबरच्या रात्री प्रक्षोभक असा फलक लावला जातो. त्यामुळे स्थानिक वातावरण खराब होते. त्यानंतर त्याबाबत बैठका होतात. त्या बैठकांमधून काही बांधवांना चिथावले जाते. त्या गोष्टी पोलिस तपासात समोर आले असून ते आयोगासमोर आणले आहे. याबाबत सविस्तर दोषारोप पत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. न्याय प्रविष्ठ बाब असू त्याबाबत सविस्तर बोलता येणार नाही. संघटनाच्या बैटका नाही तर लाँग मार्च करण्यात आले. वातावरण निर्मिती करण्यात आली. याबाबत सविस्तर खुलासा दोषारोपपत्रात आहे. याबाबत स्पष्ट सांगता येणार नाही, याचा पुनरुच्चार अड, हिरे यांनी केला.