पोलीस आयुक्तांनी 'त्या ' माननीयांची सुरक्षा काढली; २३ ठिकाणांवरील गार्डही काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 11:31 PM2024-03-18T23:31:41+5:302024-03-18T23:31:55+5:30
पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता अमितेश कुमार यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयाची चर्चा होत आहे.
- किरण शिंदे
पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता अमितेश कुमार यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयाची चर्चा होत आहे. शहरातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, आणि अध्यक्ष राहिलेल्या काही माननीयांना पुरवण्यात येणारी पोलीस सुरक्षा (गार्ड) काढून घेण्यात आली आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश नुकतेच काढले आहेत. त्यांच्या या निर्णयाने पुन्हा एकदा शहरभर चर्चेची वय राळ उठवली आहे. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तांनी राजकीय माननियांचे सुरक्षा काढून घेतल्यानंतर अनेकांनी फोना-फोनी सुरू केल्याचे चित्र पाहिला मिळाले.
राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे शहरात अनेक व्हीआयपी वास्तव्यास आहेत. व्हीआयपी असणाऱ्या काही व्यक्तींना पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते. यासोबतच जीवितास धोका असणाऱ्या अन्य काही व्यक्तींनाही पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते. राजकीय दबावातून देखील काही विशिष्ट व्यक्तींना पोलिसांना सुरक्षा पुरवावी लागते. तर काही व्यक्ती स्वतःच पोलिसांकडे सुरक्षेची मागणी करत असतात. पोलीस त्यावर निर्णय घेऊन सुरक्षा देतात. एखाद्या व्यक्तीला सुरक्षा देण्यासाठी नियम आहेत. राज्य सरकार एखाद्याला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश देतात. त्यानूसार संबंधित शहर पोलीस त्यांना सुरक्षा पुरवितात.
दरम्यान, सुरक्षा पुरविण्यासंदर्भात पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते. ही कमिटी संबंधित व्यक्तीची पडताळणी केल्यानंतरच सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेत असते. संरक्षण दिल्यानंतर ठरावीक कालावधीनंतर कमिटीची बैठक होते. त्यात दिलेले संरक्षण गरजेचे आहे का, यावर निर्णय घेऊन ते काढून घेण्याचे आदेश कमिटी घेते. दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरक्षा कमिटीची बैठक घेत आढावा घेतला. यानंतर गरज नसणाऱ्या बहुतांश व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुणे शहर पोलिसांकडून ११० जणांना पोलीस सुरक्षा पुरवली होती. त्यातील ८५ जणांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. शहर पोलिसांनी एकूण ११० जणांना पोलीस सुरक्षा पुरवली होती. त्यातील ८५ जणांची पोलीस सुरक्षा काढली आहे. शहरात आता केवळ २५ व्यक्तींनाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यामध्ये अति महत्त्वाचे व्यक्ती किंवा ज्यांच्या जीवाला धोका आहे अशांचा समावेश आहे. त्यासोबत अनावश्यक अशा शहरातील २३ ठिकाणांवरील सुरक्षा गार्ड काढण्यात आले आहेत.
नव्याने सुरक्षा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांकडे चालू वर्षात ५४ अर्ज आले होते. परंतु, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अर्जांची पाहणीकरून सर्वांची पोलीस सुरक्षा नाकारली आहे. शहरातील मोक्का सारख्या गुन्ह्यात तक्रारदार तसेच साक्षीदार असणाऱ्या चौघांचीच पोलीस सुरक्षा पोलीस आयुक्तांनी सुरू ठेवली आहे. एकीकडे कमी मनुष्यबळामुळे कामाचा ताण पडत आहे. आता यानिर्णयामुळे तब्बल साडे तीनशे पोलीस कर्मचारी हजर झाले असून, परिणामी त्याचा फायदा कामासाठी होणार आहे.