पुणे महापालिकेचे आयुक्त चिडून म्हणाले, यांना इथे काही करू देऊ नका...!
By श्रीकिशन काळे | Published: April 24, 2023 07:55 PM2023-04-24T19:55:59+5:302023-04-24T19:56:39+5:30
नदीप्रेमींनी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन त्यांना मिळालेले महापालिकेचे पुरस्कार परत करून निषेध व्यक्त केला
पुणे: नदीकाठ सुशोभीकरणामुळे पुणे महापालिका बंडगार्डन येथील हजारो झाडे कापणार आहे. एक तर नदीला नैसर्गिक न ठेवता तिला कॅनॉलचे रूप देण्यात येत आहे आणि दुसरे म्हणजे नदीकाठी असलेली जुनी हजारो झाडे तोडली जाणार आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी आज नदीप्रेमींनी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन त्यांना मिळालेले महापालिकेचे पुरस्कार परत करून निषेध व्यक्त केला.
पुणे महापालिकेच्या वतीने सध्या बंडगार्डन येथे नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम सुरू आहे. तिथे सुशोभीकरण केले जात आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ६ हजार झाडे आणि पुढील टप्प्यात आणखी हजारो झाडे काढली जाणार आहेत. त्यामुळे या वृक्षांना धक्का लावू नये, यासाठी सोमवारी जीवितनदीच्या संस्थापक शैलजा देशपांडे, शाश्वत विकासाचे अभ्यासक प्रा. गुरूदास नूलकर, प्रियदर्शिनी कर्वे,सत्या नटराजन, रणजित गाडगीळ, प्रा. अमिताव मलिक आदी सहभागी झाले होते. या सर्वांना महापालिकेच्या वतीने वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण क्षेत्रात कार्य केल्याबद्दल पुरस्कार दिला होता. परंतु, महापालिका आता जे पर्यावरणविरोधी कार्य करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी आपला पुरस्कार महापालिकेत जाऊन परत केला. तेव्हा महापालिका आयुक्त कार्यालयातून बाहेर आले. त्यांनी तेथील सुरक्षारक्षकांना ओरडून सांगितले की, यांना इथे काहीच करू देऊ नका.’’ नदीप्रेमींनी त्यांना भेटायचे आहे असे सांगितले. परंतु, आयुक्तांनी आता भेट होऊ शकत नाही. तुम्ही वेळ घेऊन या, असे चिडून सांगितले. त्यानंतर नदीप्रेमींनी आपले पुरस्कार तिथेच ठेवून महापालिका आयुक्तांचा निषेध व्यक्त केला.
प्रा. नूलकर म्हणाले,‘‘आम्ही महापालिका आयुक्तांना भेटायला गेलो होतो. पण त्यांनी आम्हाला भेट दिली नाही. ते जर आम्हाला इथे काहीच करू नका, असे बोलत असतील, तर आम्ही देखील पुणेकर आहोत. सदाशिव पेठेत राहणारे आहोत. त्यामुळे आम्ही आता मागे हटणार नाही.’’