Chakan: कंपनीने दिला मशीन विकण्याचा अधिकार; दोघांकडून गैरवापर, लावला तब्बल ३ कोटींचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 10:21 IST2025-04-15T10:21:10+5:302025-04-15T10:21:22+5:30
कंपनीने दिलेल्या अधिकारपदाचा गैरवापर करत वितरकास फोर्कलिफ्ट मशीन कमी किंमतीत विकून त्यातून आलेल्या पैशांची अफरातफरही केली

Chakan: कंपनीने दिला मशीन विकण्याचा अधिकार; दोघांकडून गैरवापर, लावला तब्बल ३ कोटींचा चुना
चाकण: कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून तब्बल तीन कोटी रुपयांचा कंपनीलाच चुना लावल्याची घटना चाकण औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कारखान्यात घडली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बालाजी धोंडगे (वय ४५, रा. मोशी, ता. हवेली) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून विवेककुमार अजेद्रनाथ ठाकूर (वय ५३, रा. बाणेर, पुणे) आणि श्रीशराज नारायण पांडे (वय ४२, रा. घोडबंदर रस्ता, कासरवडवली, ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण औद्योगिक वसाहतमधील एचडी ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (खालुंब्रे, ता. खेड) या कंपनीत विवेककुमार ठाकूर आणि श्रीशराज पांडे हे दोघे नोकरीस होते. या दोघांना कंपनीच्या वतीने त्यांना फोर्कलिफ्ट मशीन वितरकांना विकत देण्याचा अधिकार देण्यात आला होता. कंपनीने दिलेल्या अधिकारपदाचा गैरवापर करीत (दि. मार्च २०२१ ते जून २०२४) यादरम्यान वितरकास फोर्कलिफ्ट मशीन कमी किमतीत विक्री केली. त्यातून आलेल्या पैशांची अफरातफर करत विवेककुमार ठाकूर याने एकूण १ कोटी ३९ लाख रुपयांची, तर श्रीशराज पांडे याने १ कोटी ४० लाख रुपयांची अशी एकूण २ कोटी ७९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दोघांनी संगनमत करीत अफरातफर करून आलेले कोट्यवधी रुपये विवेककुमार याने पत्नी व मुलीचे नावे असलेल्या फर्मचे बँक खात्यात, तर श्रीशराज याच्या पत्नीच्या नावे असलेल्या फर्मच्या बँक खात्यात वळवून ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कंपनीची फसवणूक केली आहे. महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस पुढील तपास करीत आहेत.