कंपनीने मुलीकडून थकवा येऊपर्यंत काम करून घेतले; आईचा आरोप, २६ वर्षीय मुलीने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 01:19 PM2024-09-20T13:19:48+5:302024-09-20T13:20:33+5:30

ईवाय कंपनीत तरुणी ऑडिट आणि ॲश्युरन्स विभागात नोकरी करत असून तिच्यावर कायम कामाचा लोड टाकला जायचा, तिच्या असिस्टंट मॅनेजरने एकदा तिला एका कामासाठी रात्री बोलावले होते

The company worked the girl to exhaustion Mother allegation 26 year old girl lost her life in pune | कंपनीने मुलीकडून थकवा येऊपर्यंत काम करून घेतले; आईचा आरोप, २६ वर्षीय मुलीने गमावला जीव

कंपनीने मुलीकडून थकवा येऊपर्यंत काम करून घेतले; आईचा आरोप, २६ वर्षीय मुलीने गमावला जीव

पुणे : पुण्यातील ईवाय (Ernst & Young (EY) या प्रतिष्ठित कंपनीत काम करणाऱ्या अँना सेबॅस्टियन पेरायल या २६ वर्षीय तरुणीचा नोकरी लागल्यानंतर केवळ चार महिन्यांतच कामाच्या ताणतणावामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिची आई अनिता ऑगस्टीन यांनी केला आहे. त्यांनी थेट ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना पत्र लिहिल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. ‘मी माझे मौल्यवान मूल गमावले आहे. हे शब्द लिहिताना माझे हृदय जड झाले आहे. आम्हाला जे दुःख झाले आहे ते इतर कोणत्याही कुटुंबाला सहन करावे लागू नये. कंपनीने मुलीकडून थकवा येण्यापर्यंत जास्त काम करवून घेतले असल्याचा आरोपही त्यांनी पत्रात केला असून, घटनेच्या वेळी आणि नंतर कंपनीकडून पाठिंबा न मिळाल्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली आहे.

राजीव मेमाणी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले, की नोव्हेंबर २०२३ मध्ये मुलीने सीए परीक्षा उत्तीर्ण केली आणि १९ मार्च २०२४ ला पुण्यातील ईवाय कंपनीत तिला ऑडिट आणि ॲश्युरन्स विभागात नोकरी मिळाली. तिने भविष्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. ही तिची पहिलीच नोकरी होती आणि प्रतिष्ठित कंपनीचा भाग झाल्याचा तिला आंनद झाला होता. मात्र, चार महिन्यांनंतर २० जुलैला जेव्हा मला तिचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली. तेव्हा माझे जग उद्ध्वस्त झाले. लहानपणापासून तिच्या शैक्षणिक वर्षांपर्यंत तिने उत्कृष्ट कामगिरी केली. ती शाळेमध्येच नव्हे तर कॉलेजमध्येही टॉपर होती. विविध कौशल्य देखील तिने आत्मसात केली होती. ईवाय कंपनीत रुजू झाल्यावर ती अथक परिश्रम करीत होती. कामाचा ताण, नवीन वातावरण आणि कामाच्या जादा तासांचा तिच्यावर शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम झाला. निद्रानाश आणि जॉइन झाल्यानंतर लगेचच तिला तणाव जाणवायला लागला. आम्ही तिच्या सीए दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी पुण्यात पोहोचलो. मात्र, रात्री उशिरा पीजीमध्ये पोहोचल्यावर छातीत दुखत असल्याची तिची तक्रार होती. आम्ही तिला पुण्यातील रुग्णालयात नेले. तिचा ईसीजी नॉर्मल होता. त्यातही तिचे म्हणणे होते की खूप काम करायचे आहे आणि तिला सुटी मिळणार नाही. तिच्यावर कायम कामाचा लोड टाकला जायचा. तिच्या असिस्टंट मॅनेजरने एकदा तिला एका कामासाठी रात्री बोलावले होते. अथक मागण्या आणि अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्याचा तिच्यावर दबाव होता. तिचा स्वभाव असा होता की व्यवस्थापकांना तिने कधीच दोष दिला नसता. त्यासाठी ती खूप दयाळू होती; पण मी राहू शकत नाही. शांत नवोदितांच्या पाठीवर कामाचा भार टाकणे, त्यांना रात्रंदिवस काम करायला लावणे, अगदी रविवारी, काहीही औचित्य नसताना कामावर बोलावणे चुकीचे आहे. तुम्ही नवीन कर्मचाऱ्यांचा थोडा विचार केला पाहिजे. ती नवीन होती याचा पुरेपूर फायदा व्यवस्थापनाने घेतला असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

आम्ही युवक काँग्रेस या नात्याने अँनासारख्या कुटुंबांसोबत एकजुटीने उभे आहोत, ज्यांचे जीवन चुकीच्या कार्यसंस्कृतीमुळे उद्ध्वस्त झाले आहे. कंपन्या तरुण व्यावसायिकांची ऊर्जा, उत्साह आणि स्वप्नांचा गैरफायदा घेत आहेत. कॉर्पोरेट दबाव, अवास्तव अपेक्षा यासाठी संस्थांना जबाबदार धरले पाहिजे, हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रत्येक ऑफिसमध्ये कामासाठी संतुलित वातावरण असावे. जोपर्यंत हे प्राधान्याने होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. - अक्षय जैन, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस (मीडिया आणि कम्युनिकेशन्स)

Web Title: The company worked the girl to exhaustion Mother allegation 26 year old girl lost her life in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.