Passport Seva: पुणेकरांचे किचकट काम सोपे झाले; पासपोर्टसाठी दैनंदिन अपॉईंटमेन्ट वाढवल्या
By श्रीकिशन काळे | Published: April 11, 2023 03:53 PM2023-04-11T15:53:12+5:302023-04-11T15:53:34+5:30
ऑनलाइन नोंदणी नंतर लगेच अपॉइंटमेंट मिळते अन् पंधरा दिवसांच्या आत घरपोच पासपोर्ट पाठविला जातो.
पुणे : पासपोर्ट काढणे पूर्वी अत्यंत किचकट काम होते. परंतु, आता सर्व सोयी ऑनलाइन झाल्याने ते काढणे सोपे झाले आहे. तसेच घरपोच लवकर मिळत असून, पासपोर्ट देण्याची संख्याही वाढविण्यात आली आहे. दररोज सामान्य १०२५ आणि तत्काळसाठी २५० प्रतिदिन वाढविण्यात आल्या आहेत. एकूण २४०५ अपॉइंटनमेंन्ट दिल्या जात आहेत. त्यामुळे पासपोर्ट जारी करण्याचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती पुणे विभागाचे क्षेत्रिय पासपोर्ट अधिकारी अर्जुन देवरे यांनी दिली.
सध्या पुणेकरांचे परदेशात जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. फिरायला जाणे, नातेवाईकांना भेटायला जाणे, परदेशात कामानिमित्त जाणे आदी कारणांमुळे पासपोर्ट काढला जात आहे. पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी सकाळी लवकर केंद्रावर जाऊन रांगेत थांबावे लागत होते. केंद्राबाहेर एजंटांची गर्दी दिसायची. पण आता मात्र या सर्व गोष्ट बंद झाल्या असून, ऑनलाइन नोंदणी केली की, लगेच अपॉइंटमेंट मिळते आणि पंधरा दिवसांच्या आत घरपोच पासपोर्ट पाठविला जातो.
गेल्या वर्षी २०२२ मध्ये आम्ही २०२१ च्या तुलनेत १ लाख १३ हजारांपेक्षा अधिक म्हणजे सुमारे ५० टक्के अधिक पासपोर्ट जारी केले. गती कायम ठेवत, या वर्षी 2023 च्या पहिल्या तीन महिन्यांत, आम्ही २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीच्या तुलनेत सुमारे 40 हजार अधिक पासपोर्ट जारी केले. पासपोर्ट आणि पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट्स (पीसीसी) साठी अपॉईंटमेंन्टची संख्या वाढवली आहे. यंदा पासपोर्ट सेवा केंद्र (PSK), पुणे येथे दररोज सामान्य आणि तत्काळ योजनेच्या अपॉईंटमेंन्ट अनुक्रमे 1025 आणि 250 प्रतिदिन वाढविल्या.
इथे करा नोंदणी
नागरिकांनी अगोदर https://www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पासपोर्टसाठी नोंदणी कराव. तसेच ज्यांना तत्काळ पासपोर्ट काढायचा असेल त्यांनी https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/online/tatkaalPassports या लिंकवर जावे.
पासपोर्ट जारी
२०२१ : २ लाख ३१ हजार ३४६
२०२२ : ३ लाख ४४ हजार
२०२३ : ४० हजार (जाने-मार्च)
एका कॅन्सर रुग्णाला तातडीने पासपोर्ट जारी केला
पासपोर्ट सेवा लवकरात लवकर मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. काही महिन्यांपूर्वी एका कॅन्सर रूग्णाला उपचारासाठी परदेशात जायचे होते, त्यांना आम्ही लगेच पासपोर्ट जारी केला. परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी देखील कार्यालयात येऊन कार्यप्रणालीचे कौतूक केले होते. - अर्जुन देवरे, क्षेत्रिय पासपोर्ट अधिकारी, पुणे विभाग