Pune Municipal Corporation: नागरिकांची नासधूस करण्याची वृत्ती; पुणे शहरातील ‘स्वच्छ एटीएम’ संकल्पनाच कचऱ्यात...!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:36 AM2022-04-20T11:36:11+5:302022-04-20T11:36:41+5:30
निलेश राऊत पुणे : प्लॅस्टिक बॉटल्स, ग्लास, मेटालिक कॅन्स, प्लॅस्टिक रॅपर्स कचरा पेटीत न टाकता, ‘स्वच्छ एटीएम’मध्ये टाका व ...
निलेश राऊत
पुणे : प्लॅस्टिक बॉटल्स, ग्लास, मेटालिक कॅन्स, प्लॅस्टिक रॅपर्स कचरा पेटीत न टाकता, ‘स्वच्छ एटीएम’मध्ये टाका व पैसे मिळवा, ही अभिनव संकल्पना घेऊन पुणे शहरात बसविण्यात आलेल्या ‘स्वच्छ एटीएम’ मशीनच कचऱ्यात निघाल्या आहेत. ऐन मोक्याच्या जागी असलेल्या या मशीनचा नागरिकांनीच कचरा केल्याने, शहरात इ-टॉयलेटनंतर महापालिकेच्या परवानगीने सीएसआरमधून उभारलेली ही स्वच्छ एटीएम संकल्पनाही फोल ठरली आहे.
महापालिकेचा एक रुपयाही खर्च नसलेल्या या स्वच्छ एटीएम संकल्पनेला अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिलाही; पण काही विघ्नसंतोषी वृत्तीने या मशीन कचऱ्यात जमा होतील अशी नासधूस केली आहे. परिणामी महापालिकेने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी नुकतीच बैठक घेऊन शहरात ९ मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या, या मशीन येत्या दहा दिवसात दुरुस्त कराव्यात अन्यथा त्या तात्काळ हटवाव्यात, असा अल्टिमेटम दिला आहे. या मशीनची सुरक्षा वाढवावी, मशीनच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा आदी सूचना महापालिकेने दिल्या आहेत.
स्मार्ट सिटीत स्मार्टपणाच नाही
नागरिकांमध्ये स्वच्छतेचा योग्य तो संदेश जावा याकरिता दक्षिण दिल्ली, उत्तर दिल्ली, वाराणसी आदी शहरांपाठोपाठ पुण्यात ४० ठिकाणी या स्वच्छ एटीएम मशीन बसविण्यात येणार होत्या. प्रायोगिक तत्त्वावर सव्वा महिन्यापूर्वी जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता, कोरेगाव पार्क, खराडी आयटी पार्क, हायस्ट्रिट बालेवाडी, कोथरूड एमआयटी कॉलेज व पौड रोड तसेच राजीव गांधी उद्यान कात्रज व सारसबाग येथे या मशीन बसविण्यात आल्या होत्या.
सव्वा महिन्याच्या काळात प्रत्येक ठिकाणी साधारणत: ८०० ते १२०० नागरिकांनी पुनर्वापर योग्य असे प्लॅस्टिक टाकले. यातून (प्रतिनग) प्लॅस्टिकच्या बाटलीसाठी १ रुपया, काचेच्या बाटलीसाठी ३ रुपये, धातूच्या कॅन्ससाठी २ रुपये संबंधित नागरिकांना मिळाले. परंतु, काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी या डिजिटल मशीनची मोठी नासधूस केली. मशीनचा स्क्रीन तोडणे, पैसे काढून घेणे, मशीनचे विद्रुपीकरण करणे आदी उपद्व्याप करून या मशीन कचऱ्यात जमा केल्या आहेत. परिणामी या मशीन शहराच्या विद्रुपीकरणास कारणीभूत ठरल्याने महापालिकेने त्या दुरुस्त कराव्यात अन्यथा हटवाव्यात असाच पवित्रा या स्मार्ट सिटीत घेतला आहे.