पुणे-नगर महामार्गावर कंटेनरने कारला नेले दोन किलोमीटर फरफटत; घटना CCTV मध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:20 AM2022-09-12T11:20:58+5:302022-09-12T11:21:32+5:30
सुदैवाने या भीषण घटनेत कारमधील कुटुंब बचावले...
शिक्रापूर (पुणे) :शिक्रापूर जवळील पुणे-नगर महामार्गावर कासारी फाटा येथे एका कंटेनरने एका कारला रात्री अकराच्या सुमारास दोन किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली. या भीषण घटनेत कारमधील कुटुंब बचावले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास मद्यधुंद चालक आजगर हुसेन पिंजरी (रा. शिरपूर धुळे) हा कंटेनर (एमएच. ०४, एचएस १०९३) घेऊन अहमदनगरच्या दिशेने निघाला होता. यावेळी गणेश चत्तर (वय ३२ वर्षे) हे आपल्या (एमएच.१६, बीवाय २७८१) या कारने गांजीभोयरे ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर येथे जाण्यासाठी पत्नी तृप्ती, मुलगी साजिरी (वय दीड वर्ष) व पुतण्या शिवम (वय २२ वर्षे) असे चौघे जण पुणे-नगर महामार्गाने प्रवास करत होते. यावेळी मद्यधुंद कंटेनरचालक आजगर हुसेन याने या कारला मलटण फाटा शिक्रापूरपाठी येथे मागून येऊन धडक दिली व तब्बल सुमारे दोन किलोमीटर कासारी फाटापर्यंत फरफटत नेले.
भीषण घटना! पुणे- नगर रस्त्यावर कंटेनरने कारला तब्बल दोन किमी फरफरटत नेले#pune#Accidentpic.twitter.com/iDFFuPf6M7
— Lokmat (@lokmat) September 12, 2022
यावेळी ही घटना पाहणाऱ्या लोकांनी या कंटेनरचा पाठलाग केला. बेधुंद कंटेनरचालकाला गाडी थांबविण्यास भाग पाडले. कंटेनरमध्ये गुंतलेली ही कार बाजूला घेत यातील चत्तर कुटुंबाची सुखरूप सुटका केली. नशीब बलवत्तर असल्यानेच हे कुटुंब या थरारक अपघातातून बचावले. अपघाताची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक रणजित पठारे, पोलीस नाईक अंबादास थोरे, राकेश मळेकर शिवणकर आदींनी घटनास्थळी पोहोचत कारमधील कुटुंबाला मदत केली.